पंढरपूर - पंढरपूरमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच काही सामाजिक संस्थाही सक्रिय भाग घेताना दिसतात. मात्र आपल्या गावासाठी काही तरी देणे लागते या भावनेने भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या एका सैनिकाने पंढरपूर तालुक्यातील खरसोळी गावात 2000 ग्रामस्थांना सॅनिटायझर, मास्क आणि अर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप केले आहे. भारतीय सैन्य दलात सुभेदार या पदावर कार्यरत असणाऱ्या हनुमंत काळे यांनी गावासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पंढरपूर प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनीही गावाला भेट दिली आहे. त्यांच्या कामाचे कौतुकही केले आहे.
हनुमंत काळे यांची कोरोना साखळी तोडण्यासाठी तेरा दिवसाची सुट्टी-
पंढरपूर तालुक्यात कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे खरसोळी येथे दुसऱ्या लाटेमध्ये 125 जणांना गावात कोरोनाची लागण झाली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विविध रुग्णालयांमध्ये गावातील 45 ग्रामस्थांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे याची माहिती बडोदा येथे कार्यरत असणाऱ्या हनुमंत काळे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गावाच्या प्रेमाखातीर सैन्यदलातील 15 दिवसाची सुट्टी ही मंजूर करून घेतली. त्यानंतर त्यांनी गावामध्ये कोरोना बाबत उपाय योजना व जनजागृती करण्यास भर दिला आहे. गेल्या 19 वर्षांपासून हनुमंत काळे हे सैन्यदलात आपले कर्तव्य बजावत आहेत. या काळात त्यांनी गावासाठी भरपूर उपाययोजनाही केल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येते.
काळे यांच्याकडून खरसोळी ग्रामस्थांसाठी जनजागृती व उपाययोजना -
कोरोना संसर्ग गावात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यातूनच कोरोनाची लागण गावकऱ्यांमध्ये वाढत आहे. त्यामुळे तात्काळ वरिष्ठांकडून सुट्टी मंजूर करून घेत हनुमंत काळे यांनी गावात पहिल्या दिवसापासूनच कोरोनाची साखळी तोडण्यावर भर दिला आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी गावातील मुख्य चौक व वाड्या-वस्त्यांवर निर्जंतुकीकरण फवारणी करून घेतली. त्यानंतर गावातील प्रत्येक घराघरांमध्ये जाऊन त्यांनी कोरोना संदर्भातील कोणत्या उपाययोजना यासंदर्भात जनजागृती केली. त्यानंतर त्यांच्याकडून गावात 2000 ग्रामस्थांना सॅनिटायझर, मास्क आणि अर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप वाटप करण्यात आले. येत्या सोमवारपासून हनुमंत काळे यांच्याकडून कोरोना चाचणी कॅम्प घेण्यात येणार आहे. या सर्व गोष्टींची दखल घेत प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी गावाला भेट देऊन हनुमंत काळे यांच्या कार्याचे कौतुकही केले आहे.