सोलापूर - जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिल्हा वाहतूक शाखेला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक प्रकारे तंबी दिली आहे. त्याबाबतचा आदेश देखील जारी केला आहे. जिल्हा वाहतूक शाखेने विनाकारण वाहनधारकांना अडवून कागदपत्रे मागून त्रास देऊ नये. तसेच कारवाई करताना मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करावी आणि ही कारवाई करताना इतर वाहनधारकांना त्रास होणार नाही, याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे, असे आदेशात नमूद केले आहे.
वास्तविक वाहतूक शाखेचे काम वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे -
वास्तविकरित्या वाहतूक शाखेचे काम हे वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे हे आहे. परंतु जिल्हा वाहतूक शाखेचे काही कर्मचारी रस्त्याच्या बाजूला थांबून वाहनधारकांना कागदपत्रे मागून त्रास देत असल्याची तक्रार पोलीस अधीक्षकाना प्राप्त झाली होती. यामधून वाहनधारक आणि वाहतूक पोलीस असे वाद अनेकवेळा झाले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मालिन होत आहे. वाहतूक शाखेशी निगडित असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडावी आणि आपल्या कृतीतून सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.
आदेशात नमूद केलेले मुद्दे
- वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहनधारकांवर कारवाई करताना मोटार वाहन कायदायनव्ये कारवाई करावी. कारवाई करताना इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी
- चारचाकी, दुचाकी वाहनावर कुटुंबासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विनाकारण अडवू नये किंवा त्यांना अडवून वाहनाची कागदपत्रे मागू नये.
- चारचाकी अथवा दुचाकी वाहनावर ज्येष्ठ नागरिक जात असल्यास विनाकारण अडवून कागदपत्रे मागू नये.
- 18 वर्षे खालील मुले वाहन चालवताना आढळल्यास संबंधित वाहतूक पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी त्या 18 वर्ष खालील मुलांच्या पालकांना बोलावून कारवाई करावी.
- नाकाबंदीचे आदेश देताना नियंत्रण कक्ष सर्व माहिती देते. संशयीत वाहनांना अडवून तपासणी करावी लागते. पण या नाकाबंदीत सर्वच वाहनांना तपासले जाते. फक्त संशयीत वाहनांची तपासणी करावी.
- पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत नाकाबंदी करावी. तसेच नाकाबंदीची ड्युटी संपताच नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी.
- नाकाबंदीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी एखादा बनावट वाहनधारक बनून तपासणी करावी. संबंधित वाहतूक अंमलदार सर्वच वाहनांना त्रास देत असल्यास संबंधित वाहतूक अंमलदारावर कारवाई करावी.
- परराज्यातील वाहने नियमभंग करत असतील तर त्यांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करावी. परराज्यातील वाहने आहेत म्हणून विनाकारण अडवून कागदपत्रे मागू नये. भारताचे नागरिक आपली वाहने घेऊन नियमात राहून स्वतंत्र व मुक्त संचार करत असतात. त्यांना अडवून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्रास देऊ नये आणि महाराष्ट्र किंवा सोलापूर पोलीस दलाची प्रतिमा मालिन करू नये.
- परराज्यातील किंवा परजिल्ह्यातील नागरीक आपली वाहने घेऊन दशक्रिया विधी, मंदिर दर्शन, लग्न, समारंभ आदी कार्यासाठी जात असतात. त्यांना अडवून कागदपत्रे मागून विनाकारण त्रास देऊ नये.
- संबंधित पोलीस स्टेशन त्याच्या हद्दीत केसेस करणार असेल तर तशी माहिती नियंत्रण कशाला अगोदर द्यावी. कोणतीही नोंद न करता, वाहतूक अंमलदार अगर रस्त्याच्या कडेला किंवा आडोशाला उभारून महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना विनाकारण अडवून कागदपत्रे मागून वाहने व वाहनधारकाना ताटकळत थांबवून ठेवले आणि त्याबाबत तक्रार आली तर कारवाई करण्यात कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असे सातपुते यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.