सोलापूर - लॉकडाऊनच्या काळात महावितरणाकडून वीज मीटरचे रिडींग घेणे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सरासरी वीज वापर गृहीत धरून ग्राहकांना या काळातील बीले देण्यात आली आहेत. यामुळे अनेकांना वापरापेक्षा अधिक विजबीले मिळाली आहेत. या वाढीव वीज बिलामुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला भरमसाठ वीज बिले भरणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन काळातील चार महिन्याचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने एमएसईबीच्या कार्यकारी अभियंत्यांना केली.
कोरोना संसर्ग पसरत असल्यामुळे शासनाच्यावतीने मार्च महिन्यापासून संपूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. या काळात व्यवसाय, उद्योगधंदे पूर्णपणे बंद करण्यात आले होते. संपूर्ण उत्पन्न बुडाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या कालावधीसाठी महावितरणकडून ग्राहकांना देण्यात आलेल्या वीज बिलांमध्ये अनेक त्रुटी आहेत. ग्राहकांना कर्ज काढून वीज बिले भरण्याची वेळ येत आहे, असे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी सांगितले.
लॉकडाऊन काळात महावितरणने वीस ते पंचवीस टक्के दरवाढ केलेली आहे, ती दरवाढ तत्काळ रद्द करावी. वीज देयकातील नागरिकांवर लादलेले अतिरिक्त कर रद्द करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे संपर्क प्रमुख अविनाश फडतरे, संघटक संजय भोसले, समन्वयक अजित शेटे, अजय भोसले, महेश माने, हर्षवर्धन शेजेराव, महेश गुंब्याड, दत्ता जकनाईक, करण आवरंगे आदी उपस्थित होते.