सोलापूर - शहरात खासगी सावकारांचा सुळसुळाट वाढला आहे. काही दिवसांपूर्वी जगताप कुटुंबातील सर्व सदस्यांचा हकनाक बळी या खासगी सावकारांनी घेतला. त्यावर पोलीस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उचलत नागरिकांना आवाहन केले होते की, खासगी सावकारंपासून पीडितांनी पुढे येऊन पोलीस तक्रार करावी. या आवाहनाला प्रतिसाद देत एक वृद्ध वयस्कर निवृत्त झालेला रेल्वे कर्मचारी पुढे आला. त्याने पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना भेटून खासगी सावकारांनी कसा छळ केला, त्याची माहिती दिली. त्या माहितीनुसार गुरूवारी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात साचीन गुणवंत जाधव आणि त्याच्या भावावर गून्हा दाखल केला आहे.
2001 साली हे पीडित रेल्वे विभागातुन रिटायर्ड झाले होते. त्यावेळी त्यांनी सचिन गुणवंत जाधव आणि त्याचा भाऊ याकडून 20 हजार रुपये व्याजाने घेतले होते. तेव्हापासून आजतागायत हा खासगी सावकर या वृद्ध झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यास व्याज वसुलीसाठी मानसिक त्रास देत होता. त्या वृद्ध रिटायर्ड कर्मचाऱ्याचे पेन्शनचे एटीएम कार्ड देखील खासगी सावकाराने काढून घेतले होते. गेल्या 19 वर्षापासून या खासगी सावकाराने जवळपास 11 ते 12 लाख रुपये व्याज म्हणून घेतले आहे. त्या वृद्धास दर महिन्याला त्याच्याच एटीएममधून रोख रक्कम काढून फक्त हजार ते दीड हजार रुपये घरखर्चासाठी देत होता. बाकीची सर्व पेन्शन स्वतः व्याज म्हणून घेत होता. पोलीस आयुक्तांनी ताबडतोब आदेश देत त्या खासगी सावकाराच्या मुसक्या आवळल्या असून खासगी सावकार कायद्या अंतर्गत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - राजस्थानातून चोरलेली 9 व्या शतकातील शिवमूर्ती लंडनहून मूळ स्थानी परतणार
सोलापूरात खासगी सावकरांचा सुळसुळाट...
जगताप कुटुंब आत्महत्या प्रकरणातुन खासगी सावकारांचा मुद्दा बाहेर आला आहे. पोलिसांनी या विषयाकडे लक्ष देत नागरिकांना आवाहन केले होते, त्यामुळे खासगी सावकारगिरी करणारे पोलीस तपासात निष्पन्न होत आहे. एका रिटायर्ड रेल्वे कर्मचाऱ्यांला वीस हजार रुपयांसाठी त्याने जवळपास 11 ते 12 लाख रुपये रक्कम वसूल केली आणि 19 वर्षांपासून त्या वृद्ध पेन्शनरची पिळवणूक केली.
व्याजबट्टा करणारे वसुली पथक देखील ठेवतात...
व्याजबट्टा करणारे सावकार हे वसुली साठी पथक देखील ठेवतात. त्यासाठी ते टक्केवारी घेतात. हे वसुली करणारे सराईत गुन्हेगार किंवा समाजात दहशत निर्माण करणारे असतात. जेणेकरून वसुलीला गेले असता पीडित व्यक्ती घाबरून मुद्दल पेक्षा अधिक व्याज देतात. ह्या वसुली पथकावर देखील कारवाई गरजेची आहे.
या खासगी सावकाराना राजकीय वरदहस्त आहे का?
या खासगी सावकाराना राजकीय वरदहस्त आहे का? हे देखील पाहणे गरजेचे आहे. कारण एवढी खासगी सावकारगिरी करताना यांना पोलिसांची भीती नसते का? कोणी तक्रार दाखल केल्यास, अटक झाल्यास याची भीती नसते का? हे सर्व बाबी तपासून पाहणे गरजेचे आहे
तीन गुन्हे दाखल...
फौजदारी चावडी पोलीस ठाण्यात गेल्या पंधरा दिवसांत आजतागायत तीन गुन्हे खासगी सावकारगिरीचे दाखल आहेत. मृत अमोल जगताप यांचे बंधू राहुल जगताप यांनी प्रथम फिर्याद दाखल केली. यामधून 5 आरोपींना अटक केली असून आणखीन तीन आरोपींचा शोध सुरु आहे. तर, संतोष श्रीराम यांनी देखील खासगी सावकर विरोधात फिर्याद दिली आहे. तर गुरुवारी एक रिटायर्ड रेल्वे कर्मचाऱ्याने फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये दोन आरोपी अटक झाले आहेत