सोलापूर - टाळेबंदीच्या कालावधीत नियम तोडणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. जिल्ह्यात 57 हजार लोकांकडून 86 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्हा नियोजन बैठकीत दिली.
पोलिसांनी दंड वसुलीमध्ये दुचाकी वाहनचालक, चारचाकी वाहनचालक, विना मास्क फिरणारे, अनावश्यक फिरणारे या सर्वांवर कारवाई केली आहे. जिल्हा नियोजन बैठकीत कोरोना महामारीबाबत केलेल्या उपाययोजनांचा मंगळवारी आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहरात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याची माहिती दिली. रॅपिड अँटीजेन टेस्ट वाढवून वेळीच रुग्णांचे विलगीकरण कक्षात रवानगी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या नियमांचे उल्लघंन केल्याने दंड वसुली -
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 25 पोलीस ठाण्याअंतर्गत 57 हजार लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याकडून 86 लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. यामध्ये दुचाकी वाहनावर दोघांनी बसणे, चारचाकी वाहनामध्ये मर्यादेपेक्षा अधिक प्रवासीसंख्या, विना मास्क फिरणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे अशा कारणांसाठी पोलिसांनी दंड वसूल केला आहे. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणे आदीसह नियम तोडणाऱ्या व्यक्तींकडूनही पोलिसांनी दंड वसूल केला आहे.
लग्नसराईत कोरोनाच्या संसर्गाचे अधिक प्रमाण -
कोरोनाचा संसर्ग असताना लग्नातील वऱ्हाडाच्या संख्येवर मर्यादा आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या चार वऱ्हाडी मंडळींवर व वधू-वरांवरही आपत्ती व्यवस्थापनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नसराईमध्ये कोरोना संसर्गजन्य आजाराचा फैलाव झाला आहे, तर नागरिकांनी नियमांचे बंधन पाळून लग्नकार्य उरकून घ्यावेत, असे पोलीस अधीक्षक पाटील यांनी आवाहन केले. तसेच मंगल कार्यालयांमध्ये गर्दी होवू नये, याची दक्षता घ्यावी असेही पोलीस अधीक्षकांनी आवाहन केले आहे. आढावा बैठकीला महापालिका आयुक्त पी शिवशंकर ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, आदी अधिकारी उपस्थित होते.