सोलापूर - राज्यातील प्रमुख आठ शहरांमध्ये पाचशेहून अधिक घरफोड्या करणारा आणि थेट पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. राजेंद्र शिवाजी बाबर ( रा.किकली,ता. वाई ,जि. सातारा) आणि त्याचा साथीदार राजकुमार पंडित विभूते, असे त्या दरोडेखोरांची नावे आहे. यांना सोलापूर शहर पोलिसांच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.
बाबर हा सातारा जिल्ह्यातील आसनगावचा मूळ रहिवासी असून त्याने घरफोड्या करुन राज्यात अनेक ठिकाणी स्थावर मालमत्ता खरेदी केली असल्याची बाब सोलापूर शहर पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राजेंद्रने वयाच्या 15 व्या वर्षी पहिला गुन्हा केला होता. राजेंद्रने आतापर्यंत पाचशेहून अधिक घरफोड्या केल्या आहेत. एवढेच नाही तर त्याने पोलिसांवरही गोळीबार केला होता. त्याच्याकडून सोलापूर पोलिसांनी 55 लाख 57 हजार 920 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
राजेंद्र बाबर हा सराईत गुन्हेगार असून तो गेल्या सप्टेंबर, 2019 ला मकोकामध्ये जमीनावर सुटला आहे. त्यानंतर त्याने लगेच नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून घरफोडयांच्या सत्राला सुरुवात केली. चोरीच्या गाड्यांचा वापर गुन्ह्यात करण्यात त्याचा हातखंडा आहे. त्याने सोलापुरात तीन ठिकाणी घरफोडी केली आहे. पोलिसांनी त्याला जेरबंद केले त्याप्रत्येक गुन्ह्यात त्याच्याकडून लाखांवर मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद आणि नाशिक या आठ जिल्ह्यात त्याने मोठे गुन्हे केले आहेत.
याच घरफोडयांच्या गुन्ह्यातून मिळवलेल्या पैशांतून राजेंद्रने साताऱ्यासह राज्यातील अन्य शहरांमध्ये मालमत्तांची खरेदी केली आहे. त्याचा शोध घेणे आणि लुटीच्या वस्तू संबतधितांना परत देणे हे काम महाराष्ट्र पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
हेही वाचा - विविध मागण्यांसाठी सोलापुरात महिलांचे 'जेलभरो' आंदोलन