सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यात 9 मार्चला बोरामणी शिवारात खुनी दरोडा पडला होता. यामध्ये दरोडेखोरांनी बाबुराव हिरजे या वृद्ध व्यक्तीचा खून करून महिलेस जबर मारहाण केली होती. तसेच पाटील वस्ती येथेही खुनी हल्ला केला होता. यामुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सोलापूर ग्रामीण पोलीस ( Solapur Police ) दलातील स्थानिक गुन्हे शाखेने ( Local Crime Branch ) या प्रकरणी सहा संशयितांना बेड्या ठोकल्या ( Solapur Police Arrested Six Accused ) असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे. हे दरोडेखोर उस्मानाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून उसतोडणी कामगार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकृत माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी रविवारी (दि. 20 मार्च) दुपारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
ऊसतोड कामगार आले अन् रेकी करून गेले - पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार ऊसतोड कामगारांनी हा दरोडा घातला आहे. पण, हे सराईत गुन्हेगार आहेत. अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. दीड ते दोन महिन्यांपूर्वी उसतोड कामगारांची मोठी टोळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी शिवारात उसतोडीसाठी आली होती. त्यावेळी हे दरोडेखोरही आले होते. पाटील वस्ती व हिरजे वस्ती येथे रेकी केली होती. येथून गेल्या नंतर त्यांनी एका चारचाकी वाहनातून 9 मार्चला रात्री दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी शिवार गाठले.
पाटील वस्ती अन् हिरजे वस्ती येथे खुनी दरोडा - आठ संशयित दरोडेखोर 9 मार्चला एका चारचाकी वाहनातून आले. सुरुवातीला त्यांनी पाटील वस्ती येथे दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. पाटील वस्ती येथील नागरिकांनी कडाडून विरोध करत दरोडेखोरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा केल्याने दरोडेखोर आजूबाजूच्या शेतात लपून बसले. पहाटेच्या सुमारास त्यांनी हिरजे वस्तीतील एका शेतातील घरावर दरोडा घातला. या ठिकाणी बाबुराव हिरजे ( वय 76 वर्षे ) या वृद्ध व्यक्तिने दरोडेखोरांचा विरोध केला. त्यावेळी दरोडेखोरांनी बाबुराव हिरजे यांना जबर मारहाण करून त्यांचा खून केला व सुलोचना हिरजे यांचे हातपाय बांधून त्यांच्या अंगावरील दागिने लुटून नेले.
वेशांतर करुन विविध ठिकाणांहून आवळल्या मुसक्या - या दरोड्याचा तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे झाले होते. पाटील वस्ती येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी स्केच तयार केला. त्या आधारे तपास सुरू केला. हळूहळू पोलिसांना सुगावा मिळत गेला आणि उसतोड मजुरांची माहिती समोर आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या 6 पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेषांतर करून उसतोड मजूर दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.
हे आहेत दरोडेखोर - वैभव उर्फ भोरड्या एकनाथ काळे (वय 22 वर्षे, रा. फकराबाद, जि. अहमदनगर), संतोष झोडगे (वय 20 वर्षे, रा. डोकेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद), अजय देवगण उर्फ देवगण शिंदे (वय 22 वर्षे, रा. शेळगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), सुनील उर्फ गुल्या शिंदे (वय 23 वर्षे, रा. शेळगाव, ता. परांडा, जि.उस्मानाबाद), ज्ञानेश्वर लिंगू काळे (वय 19 वर्षे, रा. पांढरेवाडी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), विकास नागेश भोसले (वय 30 वर्षे, रा. डोकेवाडी, जि. उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. तर अक्षय काळे (रा. पिंपळगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर), अनुज उर्फ भैय्या नागनाथ भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) या दोघा संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा - Water aerodrome project at Ujjani : उजनी धरणातून विमानसेवा सुरू होणार