सोलापूर - भरदिवसा उच्चभ्रू वसाहतीमध्ये येऊन हेरगिरी करत बंद घरे फोडणाऱ्या आंतरराज्य टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये सैफअली महंमदअली सय्यद (वय 26 वर्ष,रा बुलंदशहर,उत्तर प्रदेश), महंमद मुबशीर शेखसिद्दीकी (वय 43 वर्ष रा. दिल्ली), महंमद शकील नूरअहमद तेली (वय 44 वर्ष. रा. गजियाबाद,उत्तर प्रदेश), तन्वीर अहमद जहीर अहमद अन्सारी (वय 32 वर्ष, रा. कोतवाली नगर , बुलंदशहर, उत्तरप्रदेश) या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या संशयितांकडून पोलिसांनी चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये पोलिसांनी 6 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दिवसाढवळ्या घरफोडी -
सोलापुरात काही दिवसांपासून फक्त दिवसा घरफोड्या होत होत्या. ज्या सोसायट्यामध्ये वॉचमन नाहीत अशा सोसायट्या यांचे मुख्य टार्गेट होते. पोलिसांनी रिकोर्डवरील संशयित चोरट्यांचा तपास केला. पण संशयित चोरटे सापडत नव्हते. कारण हे संशयित चोरटे चोरी करून परराज्यात जात होते. पोलिसांच्या खबऱ्यांना देखील याचा सुगावा नव्हता. शेवटी सोलापूर-बार्शी राज्य महामार्गावर एका ठिकाणी परराज्यातील एक कार थांबली होती. पोलिसांनी कारमधील संशयित व्यक्तींची कसून चौकशी केल्यानंतर चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
सीसीटीव्हीत आरोपींचे चित्रीकरण -
पोलिसांनी सोलापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी घरफोड्या झाल्या त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीचा तपास केला. त्यामध्ये हे संशयित चोरटे संशयितरित्या वावरताना सीसीटीव्हीच्या चित्रीकरणात दिसून आले. त्यावरून हेच चोरटे असल्याची खात्री झाली.
असे सापडले आरोपी -
काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेचे पोलीस हे गस्त घालत असताना जुना पुणे नाका येथील कारमबा येथे हुंडाई कार (यु.पी.13-ए.एन.-5438) थांबली होती. पोलिसांना त्या कारबाबत संशय आला. त्यांनी कारमधील सर्व संशयितांकडे विचारणा केली. पण पोलिसांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यावरून त्यांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये कुलूप तोडण्याचे साहित्य, लोखंडी कटवणी दिसली. पोलिसांचा संशय आणखीन वाढला तसेच पोलिसांना त्या कारमध्ये एका पिशवीत चांदीचे दागिने आढळली. पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना पोलीस ठाण्यात आणले आणि चौकशीस सुरुवात केली. संशयीत आरोपींनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत व फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार घरफोड्या केल्याची माहिती दिली.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेश व दिल्ली येथून मुद्देमाल हस्तगत केला -
सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी उत्तरप्रदेश व दिल्ली येथे आपले पथक पाठवले. त्याठिकाणाहून 70 तोळे सोने आणि 281 ग्रॅम चांदी असा एकूण 6 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.