सोलापूर - काँग्रेसचे माजी आमदार आणि सोलापूर जिल्ह्यातील नेते दिलीप माने यांनी काँग्रेसच्या सर्व पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. 27 ऑगस्टला दिलीप माने हे मातोश्रीवर त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसच्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील जुन्या काळातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले कैलासवासी ब्रह्मदेव माने यांचे दिलीप माने हे चिरंजीव आहे. ते मागील 25 वर्षांपासून ते काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप माने हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष देशमुख यांनी दिलीप माने यांचा पराभव केला होता.
काँग्रेसच्या स्थानिक तसेच राष्ट्रीय नेतृत्वामध्ये देखील एकमेकांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका राहिलेली नाही. काँग्रेस पक्षामध्ये कोणालाच भवितव्य आहे, असे वाटत नसल्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितले आहे.
दक्षिण सोलापूर मतदार संघात सध्या राज्याचे सहकार मंत्री भाजपचे आमदार आहेत तर दिलीप माने हेदेखील याच मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. माने आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. असे असले तरीही पक्ष ज्या ठिकाणी उमेदवारी देईल त्या मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे दिलीप माने यांनी सांगितले आहे.
मागील 25 वर्षांपासून राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या दिलीप माने यांचे कार्य हे दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर व मोहोळ या चार विधानसभा असे विस्तारलेले आहे. या सर्व ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. माने यांनी काँग्रेसला सोडून 27 ऑगस्ट रोजी मातोश्रीवर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या काळात सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा नेता हाती लागणार आहे.