सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पी.एम केअर फंडमधून सोलापूर महापालिकेने व्हेंटिलेटरची मागणी केली होती. त्यानुसार विशाखापट्टनम येथून सात व्हेंटिलेटर महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्याची एकूण किंमत ही 11 लाख 64 हजार 632 इतकी आहे. सातही व्हेंटिलेटर महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, डॉ. प्रसाद, सहायक आयुक्त श्रीराम पवार, आरोग्य अधिकारी बिरुदेव दूधभाते आदी मान्यवर उपस्थित होते.
"सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचाराकरीता दाखल होतात. व्हेंटिलेटर मशीन मिळाल्याने शहरातील गरीब रुग्णांना लाभ होईल. तसेच त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार होईल", अशी आशा महापौर श्रीकांचना यन्नम यांनी व्यक्त केली. तसेच महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पीएम केअर मधून सोलापूर महानगरपालिकेला व्हेंटिलेटर मिळावे, अशी मागणी केली होती.
विशाखापट्टणम येथून आले व्हेंटिलेटर -
सोलापूर महापालिकेकडे विशाखापट्टनम येथून सात व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहे. हे व्हेंटिलेटर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणार आहे. यावेळी सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी पालिका आयुक्तांचे आभार मानले. तसेच हे व्हेंटिलेटर गरीब आणि गरजू रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती दिली.