सोलापूर - वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत असलेल्या काळवीट हरणाची शिकार करून त्याचे मांस विक्री करणाऱ्यावर सोलापूर वन खात्याने कारवाई करत त्याला रंगेहाथ पकडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काळवीट हरणाचे मांस विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. विजयकुमार सुदाम भोसले ( वय 50 रा. संगदरी, बोरामणी जवळ, दक्षिण सोलापूर ) या संशयित आरोपीस काळवीट हरणाचे मांस विक्री करताना अटक करण्यात आली आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी इर्शाद शेख यांनी अधिकृत माहिती दिली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावाजवळ असलेल्या संगदरी या ठिकाणी काळवीट हरणाचे मांस मिळते, अशी माहिती समोर आली होती. नेचर कंजर्वेशनच्या सदस्यांनी देखील यापूर्वी अनेक तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने सोलापूर वनखाते एका खबऱ्या मार्फत लक्ष ठेवून होते. 28 ऑगस्ट रोजी शुक्रवारी रात्री खबऱ्याने पक्की खबर देत सांगितले की, काळवीट हरणाला पकडून, त्याला कापून मांस विक्री केली जात आहे. शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास वन खात्याचे अधिकारी व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी संयुक्त रित्या छापा कारवाई केली.
घटनास्थळी जाऊन कारवाई केली असता विजयकुमार भोसले हा 250 ते 300 रुपये दराने काळवीट हरणाचे मांस विक्री करत होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसानी संशयित आरोपीला ताब्यात घेत, कच्चे मांस ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता काळवीट हरणाची शिंगे, त्याच्या पायाचे नखे, काळीज, लोखंडी कुऱ्हाड, लोखंडी सुरा, हरणांना पकडण्यासाठी लागणारे नायलॉन दोरीचे जाळे, तराजू, काळवीट हरणाचे कातडे आदी साहित्य आढळून आले.
वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सर्व साहित्य व मांस जप्त करून त्याला शुक्रवारी रात्रीच अटक केली. शनिवारी त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत वन परिक्षेत्र अधिकारी इर्शाद शेख, वन परिमंडळ अधिकारी बी. एस. शेळके, वनपाल गंगाधर कणबस, बी एस भोई यांनी विशेष कामगिरी बजावली आहे. तसेच नेचर कंजर्वेशनचे भरत छेडा, पप्पू जमादार, ॲड प्रकाश अभंगे, अदित्य घाडगे तर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक देवडे, पोलीस उपनिरीक्षक दळवी आदींनी या कारवाईमध्ये कामगिरी केली.
काळवीट या वन्य प्राण्याचे शास्त्रीय नाव Black Buck (cervicapra) असे आहे. हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे. काळवीट या वन्य प्राण्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अवैध तस्करी केली जाते. या कारवाईत विजयकुमार भोसले यांचे काही संबंध आहे का? याची सखोल चौकशी केली जाणार आहे. बॉलिवडूचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यावर देखील काळवीट शिकार प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता.
हेही वाचा - खासगी रुग्णालयातील प्रसुती शुल्कात अंशतः वाढ; रुग्णांमध्ये नाराजी
हेही वाचा - मायक्रो फायनान्सच्या कर्ज वसुली तगाद्याला कंटाळून १५ कुटुंबांची मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी