सोलापूर - केंद्र सरकारने सोमवारी अचानक निर्णय घेत कांद्याच्या निर्यातबंदीबाबत अधिसूचना जाहीर केली. सरकारच्या या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध केला. याच पार्श्वभूमीवर विरेश आंधळकर या शेतकरी तरुणाने राज्यपालांना भेटीसाठी वेळ मागितली आहे.
शेतकरी तरूणाने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'मी विरेश आंधळकर सौंदरे (बार्शी, सोलापूर) गावचा रहिवासी आहे. मी एक पदवीधर असून माझी वडिलोपार्जित शेती आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामध्ये मला गावी परतावे लागले. ही केवळ माझी एकट्याची परिस्थिती नसून शहरामध्ये काम करणाऱ्या व शिकणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांच्या मुलांना आता गावाकडे परतावे लागले आहे. त्यामुळे आता वडिलोपार्जित शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना काम करून उत्पन्न काढण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे.'
यंदा निसर्गाने साथ दिली मात्र, आता मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी यंदा मेटाकुटीला आला आहे. जास्त पावसामुळे रोपांवर रोग पडले. 3 ते 4 हजार रुपये किलोने घेतलेले कांदा बियाणे यामुळे खराब झाले. त्यातून काही वाचलेल्या रोपांची लागण केली तर आता केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लादली. त्यामुळे कांद्याचे भाव गडगडणार यात शंकाच नाही. उत्पादन खर्च एकरी 35 ते 40 हजारांच्यावर जात असताना भाव मात्र किरकोळ मिळणार असल्याने खर्चही निघणार नाही. शेतकरी आणि शेतीबद्दलचे निर्णय घेताना सरकार दरबारी आमची दखल घेतलीच जात नाही. आपण संपूर्ण राज्याचा आधार आहात. आजवर अनेक राजकारणी, सिनेकलाकारांनी आपली भेट घेतल्यानंतर त्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. नैसर्गिक आणि सरकारी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा आपणच आता आधार होऊ शकता. ही सर्व परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी आपली भेट होणे अत्यंत गरजेचे आहे. तरी, कृपया इतरांप्रमाणे आपण आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना देखील भेटण्यास वेळ द्यावा, अशी विनंती विरेश आंधळकर याने राज्यपालांना केली आहे.
सोलापूरच्या विरेश प्रमाणेच धुळ्याच्या साक्री तालुक्यातील विटाई गावात राहणाऱ्या प्रियंका जोशी या शेतकरी कन्येनेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे भेट घेण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांसह कंगना रणौतला भेटणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुत्राला आणि कन्येला भेटीसाठी वेळ देतात का? हे पाहणे औत्सुकत्याचे आहे.