सोलापूर- मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. त्या बंदमध्ये सोलापूर जिल्हा सहभागी होणार नसल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली. तसेच मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही ते पवार म्हणाले. याचबरोबर सोलापूर जिल्ह्याची पुढील आंदोलनाची रूपरेषा लवकरच जाहीर करू असे देखील पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर मध्ये गोलमेज परिषदेची बैठक झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी या गोलमेज परिषदेत 10 अक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. मात्र 21 सप्टेंबरच्या सोलापूर शहर व जिल्हा बंदला येथील व्यापाऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला होता. या बंद नंतर तत्काळ राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मराठा समाजासाठी काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा 10 ऑक्टोंबरला होणाऱ्या बंद मध्ये सहभाग नसल्याचे सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी स्पष्ट केले.
21 सप्टेंबर रोजी सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंद मध्ये सोलापूर मधील व्यापाऱ्यांनी बंद मध्ये सहभागी होत कडकडीत बंद पाळला होता. आमदारांच्या घरा समोर तर खासदारांच्या मठा समोर आसूड ओढो आंदोलन झाले होते. किरकोळ घटना वगळता 21 सप्टेंबर रोजीचे आंदोलन शांततेत पार पडले. येत्या काळात सकल मराठा समाज सोलापुरात मराठा आंदोलनाची नवी दिशा ठरवणार असल्याची माहिती दिली.