सोलापूर - बचत गटांना कर्ज वाटप करण्यात सोलापूर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील ४ हजारपेक्षा जास्त बचत गटांना १०१ कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. असे करून सोलापूर जिल्ह्याने राज्यात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत २०१८-१९ या वर्षात स्वयंसहायता महिला बचत गटांना कर्जवाटप करण्यात सोलापूर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी सोलापूर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे यांचा सत्कार केला.
याबाबात संतोष सोनवणे यांनी सांगितले, की सन २०१८-१९ मध्ये ४ हजार ३२६ महिला बचत गटांना ९२ कोटी ९२ लाख रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. पण ४ हजार ८४३ महिला बचत गटांना १०१.८२ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. कर्ज वितरण करण्यात सोलापूर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात ९३९ कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे लक्ष्य आहे.
महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाले असून त्या आर्थिक सक्षम झाल्या आहेत. जिल्ह्यात १० हजारपेक्षा जास्त महिला बचत गट असून एक लाख ८५ हजार महिला सदस्य असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी बँक ऑफ इंडियाचे अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे, अमोल सांगळे, संचालक विश्वास वेताळ, उमेद अभियानच्या जिल्हा व्यवस्थापक मिनाक्षी मडवळे, आनंद माने आदी उपस्थित होते.