सोलापूर : सोलापूर शहरात एका नावाजलेल्या शाळेत एक मोठी घटना घडली आहे. दहावीच्या एका विद्यार्थ्याने नववीतील विद्यार्थ्याला उसने घेतलेले पाचशे रुपये परत दिले नाही. दहावीतील विद्यार्थ्याने पुन्हा पैसे मागताच नववीतील विद्यार्थ्याला नकार दिला. त्याने पुढे ठार मारण्याची धमकी देत पैसे मागितले. घाबरलेल्या नववीतील विद्यार्थ्याने आधी पाच हजार रुपये दिले. पुढे दहावीतील विद्यार्थी मित्र धमक्या देत गेला अन् मुलगा पैसे देत गेला. दहावीच्या मुलाने असे ८ लाख रुपये उकळले.
ब्लॅकमेल करून वसुली : दहावीच्या विधीसंघर्षग्रस्त विद्यार्थ्यास ताब्यात घेतले आहे. बालसुधार गृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. तसेच त्याच्या नातेवाईकाला अटक करून पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्याने जीवे मारण्याची धमकी देत नववीतील विद्यार्थ्याला ब्लॅकमेल केले, त्याच्या मनात दहशत निर्माण केली. घरातून पैसे आण आणि मला दे अशी धमकी दिली. घाबरलेल्या त्या विद्यार्थ्याने टप्प्याटप्प्याने घरात कपाटात ठेवलेली रक्कम आणून दिली. कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली रक्कम ज्या वेळी पीडित विद्यार्थीच्या आईने पहिली असता मोठी रक्कम गायब झाली होती.
दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने नववीतील विद्यार्थ्याला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडून दहा लाख रुपये उकळले आहे. दहा लाख रुपये उकळणाऱ्या विद्यार्थ्याच्या नातेवाईकाने देखील या गुन्ह्यात सहभाग घेतला आहे. त्याने देखील या पैशांवर डल्ला मारला. याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. - पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट
नातेवाईकवर गुन्हा दाखल : पीडित विद्यार्थ्याची आई सोलापूर शहरातील एका खाजगी शाळेत शिक्षिका आहे. त्यांच्या आईने लॉकरमध्ये ११ लाख २५ हजार रुपये ठेवले होते. मात्र, त्यांच्या नववीत शिकणाऱ्या मुलाला त्याच्या दहावीतील मित्राने ठार मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने १० लाख रुपये उकळले. या प्रकरणी विधीसंघर्षग्रस्त दहावीतील विद्यार्थ्यासह एका नातेवाईकावर गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झाला : पीडित मुलाच्या आई वडीलांचा सोलापूर शहरात कारखाना आहे. त्याची आई खासगी शाळेत शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा शहरातील नावाजलेल्या शाळेत नववीचे शिक्षण घेत आहे. त्याची मैत्री त्याच शाळेतील दहावीतील विद्यार्थ्याशी झाली. तक्रारदाराच्या मुलाने कपाटातील पैसे मित्रासोबत खर्च केले. या प्रकरणी दहावीतील एक विद्यार्थ्या व नातेवाईक आकाश खेड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दहावीच्या त्या विधीसंघर्षग्रस्त विद्यार्थ्याची पोलिसांनी बालसुधारगृहात रवानगी केली आहे, तर त्याचा नातेवाईक आकाश खेड याला कोर्टात हजर करून पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
नातेवाईकाने उचलला फायदा : दहावीतील त्या विधीसंघर्षग्रस्त विद्यार्थ्याने पैसे घेतल्याचा प्रकार त्याचा नातेवाईक आकाश खेड याला सांगितला. नातेवाईकानेही मुलाला धमकावत २ लाख रुपये घेतले. सहा महिन्यांनंतर घटना उघडकीस आली. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आईने डिसेंबर २०२२ मध्ये मोजली होती. चावी कपाटातच ठेवलेली होती. त्यानंतर पैसे मोजल्यानंतर कपाटात फक्त एक लाख रुपये शिल्लक होते.
काय म्हणतात मानसोपचार तज्ज्ञ: सोलापुरातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निहार बुरटे यांनी याबाबत बोलताना मत व्यक्त केले. त्यांनी पालकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. समाजातील पालकांनी आपल्या पाल्यांकडे बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुलं वापरत असलेल्या सोशल मीडियावर त्यांच्या होत असलेल्या बारीक-बारीक हालचालींवर पालकांचे लक्ष असणे गरजेचे आहे. सोलापुरात दहावीच्या विद्यार्थ्यांने जे कृत्य केले ते निंदनीय आहे. हा सर्व प्रकार पाहता टीव्ही, मोबाईल आणि पालकांचे दुर्लक्ष हे सर्व कारण कारणीभूत असल्याचे मत डॉ. निहार बुरटे यांनी व्यक्त केले
ओटीटी प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठिंबा: ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसिरीज किंवा अनेक सिनेमांमध्ये हिरोच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठिंबा असल्याचे दृष्य प्रदर्शित केले जाते. याचे प्रतिबिंब कोवळ्या मुलांवर गंभीररीत्या छाप घालून जाते. याचीच पुनरावृत्ती समाजातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलं किंवा विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे पालकांनी आपली मुलं विद्यार्थी अवस्थेत असताना अशा वेबसिरीज किंवा सिनेमा पाहू नये याची खबरदारी घ्यावी, असे डॉ. निहार बुरटे यांनी समाजातील पालकांना आवाहन केले आहे.
हेही वाचा :