सोलापूर - महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी रविवारी आदेश काढून सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची ( Shri Siddheshwar Yatra Rules ) नियमावली जाहीर केली आहे. मागील अनेक दिवसांपासून यात्रा कशा पद्धतीने होणार याची उत्सुकता नागरिकांना लागली होती. मात्र, आता यंदाची महायात्रा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटी प्रमाणे होणार आहे. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचे सावट यंदाच्या महायात्रेवर आल्याने सिद्धेश्वर भक्तांत नाराजी पसरली आहे.
याप्रमाणे असणार सिद्धेश्वर महायात्रा -
- यात्रेचा पहिला दिवस : 12 जानेवारी रोजी यन्नी मज्जन हा धार्मिक विधी आहे. त्यामध्ये सकाळी ८.०० वाजता उत्तर कसबा येथिल श्री मल्लिकार्जुन देवळाजवळ असलेल्या हिरेहब्बू यांच्या निवास स्थानापासून काठयांची (नंदीध्वज) मिरवणूक निघते. त्याच दिवशी पुन्हा दुपारी १.०० वाजता श्री सिध्देश्वर मंदिरातून मिरवणूक निघून ६८ लिंगास योगदंडासह तैलाभिषेक करुन पुजा केली जाते. या काळात मिरवणुकीमध्ये मानकरी, नंदीध्वजधारक व भाविक मोठया प्रमाणात येऊन गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे ओमिक्रॉन व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये याचा विचार करता यनींमज्जन या धार्मिक मिरवणुकीस परवानगी दिली नाही. विधीवत धार्मिक कार्यक्रम करण्याच्या अनुषंगाने ११ जानेवारी रोजी मानाचे ७ नंदीध्वज अगोदरच मंदिर परिसरात ठेवून तेथेच सजविण्यात यावे. नंदीध्वज सजविणेचा कार्यक्रम श्री सिध्देरामेश्वर देवस्थान मंदिर परिसरामध्ये पुजारी, मानकरी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. प्रत्येक नंदीध्वजा समवेत 5 व्यक्ती (एकूण ३५ व्यक्ती) तसेच त्यांच्या सोबत इतर १५ पुजारी व मानकरी असे मिळून एकूण ५० व्यक्ती यांना परवानगी देण्यात आली आहे.
- यात्रेचा दुसरा दिवस : १३ जानेवारी रोजी मंदिर परिसरातील संमती कट्टा येथे अक्षता सोहळ्याच्या धार्मिक विधी असतो. त्यासाठी मानकरी व ७ नंदीध्वजासह परवानगी असलेले नंदीध्वजधारक यांचेसह संमती कट्टा येथे श्री सिध्दरामेश्वर देवस्थान येथून संमती कट्ट्यापर्यंत धार्मिक कार्यक्रमापुरते परवानगी देण्यात येत आहे. अक्षता सोहळा संपल्यानंतर ६८ लिंग प्रदक्षिणाकरीता नंदीध्वज मिरवणुकीस परवानगी देण्यात येणार नाही. अक्षता सोहळा कार्यक्रमासाठी मंदिर समितीकडून लसीकरणाचे २ डोस पूर्ण झालेल्या व ४८ तासाच्या आतोल RTPCR चाचणी निगेटिव्ह असलेल्या मानकऱ्यांसाठी पासेसची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक नंदीध्वजासमवेत ५ व्यक्ती (एकूण ३५ व्यक्ती) तसंच त्यांचेसोबत इतर १५ पुजारी व मानकरी, असे एकूण मिळून ५० व्यक्ती यांना परवानगी देण्यात येत आहे. संमती कट्टा येथील कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नंदीध्वज हे श्री सिध्देश्वर मंदिर या ठिकाणी निश्चित केलेल्या ठिकाणी स्थानपन्न होतील.
- यात्रेचा तिसरा दिवस : 14 जानेवारी रोजी नंदीध्वजासह तिळ व हळदीचे उटणेचे लेपन करुन मंदिर परिसरातील तलावामध्ये गंगास्नान घालण्याचा धार्मिक कार्यक्रम असतो. या कार्यक्रमासाठी योगदंडाचे मानकरी यांना नंदीध्वज विरहित विधी करण्यास परवानगी असेल. तसेच त्यांच्या सोबत निश्चित केलेल्या एकूण ५० व्यक्ती यांना परवानगी देवून मंदिर परिसरातच विधी करणेस परवानगी देण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी सायंकाळी पहिल्या नंदीध्वजास नागफणी बांधून व इतर नंदीध्वजास बाशिंग व सजावट करता येईल. त्यानंतर नंदीध्वजाच्या मिरवणूकीस परवानगी देण्यात येणार नाही. होम मैदान येथे होम प्रदिपन कार्यक्रमासाठी नंदीध्वज विरहीत योगदंडासह श्री सिध्देश्वर मंदिरपासून फडकुले सभागृहाच्या बाजूच्या रस्त्याने नॉर्थकोटकडे असलेल्या मार्गाकडून होम मैदानावर प्रवेश करतील. तेथून होम मैदानावर होम कुंडाजवळ निश्चित केलेल्या योगदंडधारक व मानकरी यांच्यासह औपचारिकता म्हणून या विधीस उपस्थित राहणेस परवानगी देण्यात आली आहे.
- यात्रेचा चौथा दिवस : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी होम मैदान येथील दिनांक 15 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या शोभेच्या दारु कामासाठी परवानगी देण्यात येणार नाही.
- यात्रेचा पाचवा दिवस : 16 जानेवारी रोजीच्या कप्पडकळी कार्यक्रम मिरवणूकीस परवानगी देण्यात आली नाही. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव विचारात घेता नंदीध्वजाची नगर प्रदिक्षणा मिरवणूक न काढता प्रतिकात्मक स्वरुपात श्री सिध्दरामेश्वर योगदंड घेऊन मंदिर परिसरात पार पाडतील. या नंदीध्वजासमवेत ०५ व्यक्ती (एकूण ३५ व्यक्ती) तसेच त्यांचे सोबत इतर १५ पुजारी व मानकरी, असे मिळून एकूण ५० व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.
दोन डोस असलेल्याना मंदिरात प्रवेश-
१२ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांकरीता ऑनलाईन दर्शन पासची सुविधा मंदिर समिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच दर्शनाकरीता सकाळी ८.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत एकावेळी फक्त ५० भाविकच मंदिर परिसरात असतील याची दक्षता मंदिर समिती घेईल. दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांचे लसीचे २ डोस झालेले असावेत. यात्रा कालवधीत श्री सिध्देश्वर मंदिर भाविकांना केवळ मुखदर्शनासाठी खुले राहिल.
हेही वाचा - Corona wave in Mumbai : मुंबईत तीन दिवसात रोज २० हजारावर रुग्ण, 104 पोलीस रुग्णालयात