सोलापूर - जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या सब जेलमध्ये कोरोनाने प्रवेश केला आहे. या तुरुंगातील 20 पैकी 13 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर या कैद्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी रात्री तीन कैद्यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या तिघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व कैद्यांची तपासणी करण्यात आली. यात आणखी 10 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सध्या या सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
जिल्हाधिकारीही विलगीकरणात
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. तेही क्वारन्टाईन आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेऊन सध्या ते घरातूनच शासकीय कामकाज हाताळत आहेत. दरम्यान, मोहोळ येथील सबजेलमधील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सोलापूर शहरातील कोरोनाग्रस्तांमध्ये पुरूष अधिक
सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांसोबत मृतांचाही आकडा वाढू लागला आहे. मृतांमध्ये सहव्याधी असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आजतागायत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत अधिक आहे. सोलापूर शहरात 7 हजार 592 पुरुष रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 5 हजार 163 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच 449 पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 220 महिलांचा कोरोना विषाणूने मृत्यू झाला आहे.