सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदार संघात चूरशीची लढत होत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे सोलापुरातील निवडणूक तिरंगी होत आहे. या तिरंगी लढतीत कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकूमार शिंदे यांना कोणताही दगा-फटका होऊ नये, यासाठी खूद्द शरद पवार हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक घडामोड आणि हालचाल दररोज कळविण्याच्या सूचना खू्द्द शरद पवारांनी केल्या आहेत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकूमार शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापुरात दोन सभा घेतल्या तसेच सोलापुरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी-गाठीदेखील घेतल्या. सुशीलकूमार शिंदे यांची सोलापुरातील सीट डेंजर झोनमध्ये आहे. वंचित बहूजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभेच्या रिंगणात उडी घेतल्यामुळे मागासवर्गीय समाज प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीमागे उभा राहिल्याचे चित्र सध्या सोलापुरात पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये सुशीलकूमार शिंदे यांच्यासाठी शरद पवार हे धावून आले आहेत. त्यासाठी पवारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्या, कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांनादेखील कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येकांची व्यक्तीगत भेट घेऊन प्रत्येकाला शरद पवारांनी वेळ दिला आणि कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
राष्ट्रवादी भवनात पार पडल्या भेटी-गाठी-
शरद पवार यांनी सोलापूर शहरातील रामलाल चौकातील राष्ट्रवादी भवनात तब्बल तीन तास बसून सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा मतदार संघातील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी पक्षांतर्गत असलेल्या गटा- तटाचे म्हणणे देखील पवारांनी ऐकून घेतले. यावेळी मंगळवेढा शहरातील तसेच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील स्थानिक पातळीवरील वाद देखील पवारांनी मिटविल्याचे बोलले जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात पवारांचा जूना स्नेहबंध
सोलापूर जिल्ह्यातील खडान-खडा माहिती शरद पवार यांना आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील पवारांनी भूषविलेले होते. त्यामुळे शरद पवारांनी सोलापूर लोकसभा मतदार संघातील त्यांच्या जून्या जाणत्या लोकांनादेखील मतदार संघातील घडामोडी कळविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
माढ्यात पवार कुटूंबीय प्रचारात-
संपूर्ण राज्यात लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदार संघात प्रचारासाठी पवार कुटूंबीय उतरल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित पवार, अजित पवार यांच्यासह खूद्द शरद पवार यांच्यादेखील सभांचे माढ्यात आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माढा लोकसभा मतदार संघातील निवडणूक ही प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे खूद्द शरद पवार हे देखील मतदार संघातील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेऊन आहेत.