सोलापूर - महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. मागील तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे.
परिवहन कामगारांचा पगार हा मागील १४ महिन्यापासून थकलेला आहे. थकित पगार मिळावा यासाठी सोलापूर महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे. मागील ६० तासांपासून प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि परिवहन कर्मचारी हे जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि प्रशासनाकडून दिले जाणारे अश्वासन यातून तोडगा निघत नसल्यामुळे पाण्याच्या टाक्यावरील आंदोलन सुरूच आहे. आषाढी वारीकरीता मुख्यमंत्री सोलापूरात येत आहेत. सोलापूर शहरात मूख्यमंत्री आल्यावर मुख्यमंत्र्याच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा इशारा प्रहार संघटनेचे जमीर शेख यांनी दिला आहे.