सोलापूर- शहर गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या सहा संशयीत आरोपींना घरफोडीच्या गुन्ह्याखाली बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सहा तोळे सोने, दीड तोळे चांदी आणि रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील काही व्यक्ती चोरीचे सोने विकण्यासाठी जुना एम्पोलायमेंट चैक येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना अटक केली आहे.
सहा आरोपींना अटक
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी झाली होती. या घरफोडीचा तपास करत असताना, गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती की, घरफोडीमधील सोने विक्री करण्यासाठी आरोपी एम्पोलायमेंट चैक येथे येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून या सहा आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांच्याकडे चौकशी केली असता, सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडील मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अशी आहेत आरोपींची नावे
सोलापूरमध्ये दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत आहे, चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या व्यक्तींचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. यापूर्वी देखील कारमबा येथून पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. ते उत्तर प्रदेशमधील असल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा चोरीच्या गुन्ह्यात उत्तर प्रदेशातील सहा जणांना अटक केली आहे. सत्येंद्र सुरेंद्र सिंह(वय 44 ,रा अडरा,उत्तर प्रदेश), कमलादेवी वीरेंद्र चौरसिया(वय 47,रा सतनी सराय, बलिया, उत्तर प्रदेश), खुशबू फुलचंद्र पांडे(वय 24), घिरनमती मोती पांडे(वय 29 दोघी रा. गाजीपुर उत्तर प्रदेश) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.