सोलापूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरबाजी करू नये. आज थोड्या वेळासाठी बाहेर पडलात. काही तासांचा प्रवास केला ही मोठी गोष्ट आहे. राज्य सरकार काय मदत करते ते महत्वाचे आहे. केंद्र सरकार मदत करेल. मात्र, राज्य संकटात असताना आणि संकटे जाणून घेत असताना अशा प्रकारचे थिल्लर वक्तव्य करणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, असा टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
सोलापूर जिल्ह्याला परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे, नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. माढा आणि करमाळाच्या दौऱ्यावर असताना फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर टोला लगावत, संकट आले की सगळी जबाबदारी केंद्रावर ढकलायची आणि आपण नामानिराळे व्हायचे. असे फडणवीस यांनी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुनावले.
केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे. आता लोकांना मदतीची गरज असताना केंद्राकडे बोट दाखवण्याऐवजी त्यांनी हिम्मत असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी. आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर केली होती. केंद्राची मदत जेव्हा यायची तेव्हा येईल, मात्र आपण मदत करायला हवी, अशा भावनेतून आम्ही ती मदत केली होती. अशी आठवण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.
हेही वाचा- शेतकऱ्यांना वेळीच मदत न केल्यास रस्त्यावर उतरू - राजू शेट्टी