पंढरपूर (सोलापूर)- केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व शेतमजूर कामगार यांच्यासंदर्भातील दोन काळे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी पंढरपुरात काँग्रेसच्या वतीने सह्यांची मोहीम राबविण्यात आली. पंढरपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी शेतकरी, कामगार व शेतमजुरांनी या मोहिमेस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
केंद्र सरकारने नुकतेचे शेती आणि शेतमजूर कामगार विषयक कायदे मंजूर करून घेतले. त्याला पंजाब हरियाणा या राज्यासह महाराष्ट्रातूनही काँग्रेसच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. काँग्रेसने राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने या कायद्याविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. त्याप्रमाणेच पंढरपुरातही त्या कृषी कायद्यांविरोधात सह्यांची मोहीम राबविण्यात आली. तत्पूर्वी या सह्यांच्या मोहिमेसाठी काँग्रेसच्या वतीने आयोजित बैठकीस जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोरराजे पवार यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बजरंग बागल, प्रतापसिंह रजपूत, नागेश गंगेकर, माजी शहराध्यक्ष सुहास भाळवणकर, पंढरपूर शहराध्यक्ष राजेश भादुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कामगारांच्या न्यायहक्कावर गदा-
हे विधेयक शेतकर्यांच्या अर्थकारणाला मोठा धक्का देणारे असून. त्याच बरोबर कामगार कायद्यात करण्यात आलेले बदल हे कामगारांच्या न्यायहक्कावर गदा आणणारे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने त्यास विरोध केला पाहिजे, अशी भूमिका मांडण्यात आली. यावेळी सह्यांचे फॉर्म पक्ष निरिक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी किशोर पवार, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी देवानंद इरकल, नागनाथ अधटराव, समीर कोळी, अमर सुर्यवंशी, दत्ता झरकर, बाळासाहेब आसबे, सागर देवकुळे, मधुकर फलटणकर, सुरज कुकडे आदी उपस्थित होते. शेवटी राजू उराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.