सोलापूर Solapur Siddharameshwar Yatra : ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची सिद्धेश्वर महायात्रा यन्नीमज्जन, तैलाभिषेक सोहळ्याने सुरू झाली आहे. आशियातील सर्वात मोठी महायात्रा म्हणून यात्रेकडं पाहिलं जातं. रविवारी सकाळी ८ वाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा झाली. पूजा झाल्यानंतर नगर प्रदिक्षणेस सुरुवात झाली. यावेळी सिध्देश्वर प्रशालेसमोर कलेक्टर कचेरीच्या जुन्या फाटकाजवळ सरकारतर्फे आहेर केला.
अक्षता सोहळ्याची परंपरा : मानाचे सातही नंदीध्वज सोलापुरातील पारंपरिक मार्गावरून संमती कट्ट्यावर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास दाखल झाले. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडाची कुंभार कन्याशी बाराव्या शतकांमध्ये विवाह झाल्याची आख्यायिका आहे. त्याच श्रद्धेने सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीकात्मक अक्षता सोहळ्याची परंपरा सुरू आहे. रविवारी दुपारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पालिका आयुक्त शीतल तेली उगुले, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार रोहित पवार, भाजपा आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी आदींच्या उपस्थितित मानकऱ्यांनी अक्षता सोहळा संपन्न केला.
अशी आहे आख्यायिका : सिद्धरामेश्वर महाराजांच्या कुटीबाहेर एक कुंभाराची कन्या दररोज सकाळी सडा- रांगोळी करत होती. ही गोष्ट सिद्धेश्वर महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या कुंभार कन्येला तिची अपेक्षा विचारली असता, तिने सिद्धेश्वरांशी विवाह करू इच्छित असल्याचं सांगितलं. तेव्हा सिद्धेश्वरांनी अत्यंत नम्रपणे आपण लिंगागी असल्यानं विवाह करू शकत नसल्याचं सांगितलं. मात्र, तरीही कुंभार कन्येने हट्ट केल्यावर त्यांनी तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्याचा सल्ला दिला. त्याच विवाहाचं प्रतीक म्हणून सोलापुरात मकर संक्रांतीला हा विवाह सोहळा संपन्न होतो, अशी आख्यायिका आहे. त्याला अक्षता सोहळा म्हणतात. या विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी ती कुंभार कन्या सती जाते, असं मानलं जातं. त्यामुळं उद्या (सोमवारी) सोलापुरातल्या होम मैदानावर होमविधी पार पाडतो.
आशियातील सर्वांत मोठी यात्रा : हळदी, विवाह आणि होम हे तीन प्रमुख विधी आहेत. होम म्हणजे प्रेमासाठी सती जाणं. ही त्यागाची गोष्ट घडलेली असल्याचं सांगितलं जातं. या घटनेला सर्व समाज साक्षीदार असल्यानं या यात्रेत ७ समाजाच्या मानाच्या ७ काठ्या निघतात. लोकं मोठ्या श्रद्धेने या यात्रेला हजेरी लावतात. आशिया खंडातील सर्वांत मोठी यात्रा म्हणून या यात्रेचा उल्लेख होतो, कारण ही यात्रा आजपासून एक महिनाभर चालते.
मानाच्या 7 नंदीध्वजाची मिरवणूक : रविवारी सकाळी 8 वाजता हिरेहब्बू वाड्यातून मानाचे 7 नंदीध्वजाची मिरवणूक निघाली. शहरातील दत्त चौक, माणिक चौक, विजापूर वेस, जिल्हाधिकारी कार्यालयसमोरून ही मिरवणूक सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या संमती कट्यावर पोहोचेली. या ठिकाणी सिध्दरामेश्वरांच्या हातातील योगदंडाच्या साक्षीने सुगडी पुजा करण्यात आली. त्यानंतर मानकरी कुंभार यांना हिरेहब्बू यांच्या हस्ते विडा दिला गेला. त्यानंतर संमती कट्यावर सर्व मानकरी आल्यानंतर तम्मा शेटे यांनी संमती (अक्षता) वाचन केली. हा अभूतपूर्व असा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक दरवर्षी उपस्थित होते.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातुन भाविक दाखल : नगर प्रदक्षिणेसह तैलाभिषेक सोहळा पार पडला. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला जवळपास 900 वर्षांची परंपरा आहे. यात्रेला केवळ सोलापूरच नाही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातून देखील भाविक येत असतात. श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही सोलापूरमध्ये गड्डा यात्रा म्हणून ओळखली जाते. यात्रेतील प्रमुख विधी असलेल्या अक्षता सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित असतात.
हेही वाचा -