सोलापूर - कोरोना व्हायरसच्या भीतीने एकीकडे सर्वच घटक सतर्क झाले असताना दुसरीकडे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीनेही सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. शहराचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दूभाव लक्षात घेता सोलापूर जिल्ह्यातील सर्व मंदिर बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या त्यानंतर आज सकाळ पासून सिद्धेश्वरांचे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट ही राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक असलेली तीर्थक्षेत्र आहेत. ही तीर्थक्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिरही बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. त्यानंतर बूधवारपासून हे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहरवासीयांसह सर्वच विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. गर्दी होणाऱ्यां कार्यक्रमांना त्यांनी बंदी घातली आहे.