सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर येत आहेत. मंगळवारी पवार सांगोला आणि मंगळवेढा या तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीचा राज्यातील अखेरचा टप्पा संपल्यानंतर काल (सोमवार) शरद पवार यांनी मुंबईमध्ये मतदान केले. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी पवार राज्याच्या दुष्काळी दौऱ्यावर निघाले आहेत.
सांगोला तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. निवडणुकीच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाकडे शासन व प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे मागणी असताना देखील वेळेवर चारा छावण्या सुरू झाल्या नाहीत. जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हा दुष्काळ दौरा आयोजित केला आहे.
आज (मंगळवार) सकाळी सव्वाअकरा वाजता पवार बारामतीवरून हेलिकॉप्टरने सांगोला येथे येणार आहेत. सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील दुष्काळाने जळालेल्या फळबागा शेततळी यांची ते पाहणी करणार आहेत. तसेच वाटंबरे येथील चारा छावणी लादी येथे भेट देणार आहेत. दुपारी चार वाजता पवार हे मंगळवेढा तालुक्यातील शिरसी व खुपसंगी या दुष्काळी गावाला भेट देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांनी दिली आहे.