सोलापूर - शिवसेनेचा नगरसेवक लक्ष्मण यलप्पा जाधव उर्फ काका यास अखेर सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी एमपीडीए कायद्याअनव्ये स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला आहे.
12 जुलैला जुना पूना नाका येथील हांडे फ्लॅट येथील एका इमारतीत अमोल जगताप या ऑर्केस्ट्रा बार चालकाने राहत्या घरी पत्नी व दोन मुलांचा खून करून आत्महत्या केली होती. त्याने सावकारी जाचाला कंटाळून हे पाऊल उचलला असल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आले होते. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच एका सोसाईड नोटमध्ये देखील सावकारांची नावे समोर आली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य बघून हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या खासगी सावकारांना ताब्यात घेतले होते. ज्या खासगी सावकारांनी अमोल जगतापवर सावकारी पाश आवळला होता. त्या सावकारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ काका जाधव याचे देखील नाव होते. पोलिसांनी त्याला कर्नाटक (धुळखेड) येथून अटक केले होते.
लक्ष्मण जाधव याच्यावर दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांची तपासणी करत त्याची एक फाईल पोलीस आयुक्तांसमोर तयार करून ठेवण्यात आली. लक्ष्मण जाधव यावर रामवाडी, न्यू धोंडिबा वस्ती, सेटलमेंट फ्री कॉलनी, वांगी रोड, बाळे क्रॉस रोड, उमा नगरी, भैय्या चौक, लक्ष्मी-विष्णू चाळ, मेकॅनिक चौक, शिवाजी चौक आदी परीसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होता. धमकावणे, मारहाण करणे, जमाव जमवून दंगा करणे, खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे, जुगार खेळणे, आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, विना परवाना सावकारी करणे, कर्ज वसुलीसाठी त्रास देणे आदी स्वरूपाचे गुन्हे त्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
सार्वजनिक जीवितास या लक्ष्मण जाधवकडून धोका आहे असे सिद्ध होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच 1994 पासून फौजदार चावडी व सलगर वस्ती पोलीस ठाण्यात 11 प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मण जाधव यावर 2012 साली प्रतिबंधात्मक कारवाई देखील झाली होती. पण, त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची सुधारणा झाली नसल्याने अखेर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एमपीडिए अधिनियम 1981 अन्वये स्थानबधतेचे आदेश पारित केले आहे.
नगरसेवकाच्या पत्नी व मुलावरही गंभीर गुन्हे दाखल
लक्ष्मण जाधव याचा मुलगा विकास उर्फ विकी लक्ष्मण जाधव यावर देखील सलगर वस्ती पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो सोलापूर जिल्ह्यातून तडीपार आहे. या तडीपारचा आदेश भंग करून सोलापूर शहरात फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर लक्ष्मण जाधव यांची पत्नी तीपव्वा उर्फ शारदा लक्ष्मण जाधव यावर देखील शिराळकोप्पा (कर्नाटक) येथील पोलीस ठाण्यात अनेक जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा - गॅसचा काळा बाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई; 1 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त