सोलापूर : राज्याच्या कोरोना मृत्यूदरापेक्षाही सोलापूरचा मृत्यूदर अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली. ते रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
सोलापुरातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता शरद पवार यांनी जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्हास्तरीय बैठक घेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. इंदापूर मार्गे पंढरपूर असा दौरा करत दुपारी 12.30च्या सुमारास पवार यांचा ताफा शासकीय विश्रामगृह येथे दाखल झाला. काही वेळातच त्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जिल्हा नियोजन कार्यालयात आढावा बैठक घेतली. मुंबई, पुणे नंतर सोलापूरात कोरोना संसर्गजन्य आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. यावर उपाययोजना करण्याबाबत त्यांनी चर्चा केली.
या बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, तसेच पालकमंत्री दत्ता भरणे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार प्रणिती शिंदे, महापौर कांचना यंनम आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठकीनंतर, सायंकाळी पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोना संसर्गजन्य आजाराने सोलापूरात एकच थैमान मांडले आहे. सोलापुरातील कोरोना मृत्यूदर हा राज्यापेक्षाही अधिक आहे, त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली. मुंबई, पुणे, नाशिक या जिल्ह्यांपेक्षा सोलापूरची स्तिथी अतिशय गंभीर आहे. त्यामुळे चाचण्या वाढवा, खाटा वाढवा, संस्थात्मक विलगीकरणात असलेल्यांची योग्य काळजी घ्या, आणि मृत्यूदर कमी करण्याकडे विशेष लक्ष द्या अशा सूचना यावेळी पवारांनी केल्या.
सोलापूरात पहिला रुग्ण 12 एप्रिलला आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला होता. 12 एप्रिल ते 12 जुलै या चार महिन्यांमध्ये जिल्ह्यात कोरोनामुळे 365 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 5 हजार 292 रुग्णांची नोंद झाली आहे. झाले आहेत.
हेही वाचा : राम मंदिर बांधून कोरोना महामारी जाणार नाही; त्यासाठी उपाययोजना महत्वाच्या : शरद पवार