सोलापूर - वाराणसी येथे होणाऱ्या चौथ्या अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद येथील शांतितीर्थ संगय्या स्वामी चाकूरकर यांची निवड करण्यात आली आहे. ते वीरशैव साहित्याचे गाढे अभ्यासक असून वीरशैव संशोधन कार्यासाठी एके काळी प्रसिद्ध असलेल्या कपिलधार मासिकाचे संपादक होत.
श्री जगद्गुरू विश्वाराध्य जनकल्याण प्रतिष्ठान, वाराणसी यांच्या वतीने चौथे अ.भा.वीरशैव मराठी साहित्य संमेलन जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सान्निध्यात ८, ९ आणि १० फेब्रुवारी २०२० या काळात वाराणसी येथे होत आहे. संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते होणार आहे.
बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील रेणुक विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून शांतितीर्थ संगय्या स्वामी यांनी कार्य केले आहे. कपिलधार मासिकाचेही ते संपादक होते. त्यांची मन्मथशिवलिंगकृत गुरुगीता, वीरशैवांची स्फुट कविता, सांब ब्याळे: चरित्र व वाङमय, वीरशैव भजनी भारूडे ही साहित्यसंपदा प्रकाशित झाली आहे. त्यांनी गेल्या अडीचशे वर्षांतील दुर्मीळ हस्तलिखितांचे संकलन आणि संशोधन केले आहे. प्रामुख्याने २५० वर्षांपूर्वीच्या श्री मन्मथ स्वामी यांच्या परमरहस्य ग्रंथाची प्राचीन प्रत, संत महात्मा बसवण्णा यांची जन्मपत्रिका आणि बाळाजी बाजीराव पेशवे (१७६०) यांनी माणूर मठास दिलेली सनद यांसारखी १७५० पासूनच्या अनेक दुर्मीळ हस्तलिखितांचे स्वामी यांनी संकलन आणि संशोधन केले आहे.