सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी शिव शंकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी हा लॉकडाऊन असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात दररोज हजारांच्या पटीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला गेला. या पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव हे उपस्थित होते.
8 मेच्या रात्रीपासून 15 मेपर्यंत कडक निर्बंध -
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करत 8 मेच्या रात्रीपासून 15 मेच्या रात्री 8 पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असणार आहेत. भाजी मार्केट, किराणा दुकान सर्व बंद करण्याचे आवाहन केले आहे. मेडिकल दुकानदाराने ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. पार्सल सेवा मात्र सुरू राहणार आहे. वैद्यकीय कारणाशिवाय कोणत्याही नागरिकाला घराबाहेर पडता येणार नाही. पेट्रोल मात्र, सुरू असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
वैद्यकीय सेवा वगळता सर्व बंद -
सोलापूर शहरात कोरोना विषाणूची लाट ओसरत आहे. सध्या सोलापूर शहरात 1 हजार 756 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र, ग्रामीण भागात रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सात दिवसांचे लॉकडाऊन लागू आहे. वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही प्रकारची सेवा सुरू राहणार नाही. किराणा दुकान, आडते दुकाने, बिअर शॉपी, वाईन शॉप, खासगी आस्थापना बंद राहणार आहे. बँकेत फक्त अत्यावश्यक कामांना मंजुरी दिली जाणार आहे.