पंढरपूर (सोलपूर) - जिल्हा परिषदेचे शिक्षक व ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे. ‘कार्लो मझोने-रणजित डिसले स्कॉलरशिप’ या नावाने ४०० युरोची ही स्कॉलरशिप इटलीतील सॅमनिटे राज्यातील १० विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
कॅम्पानिया प्रांतातील १०० मुलांना स्कॉलरशिप
विद्यापीठ स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाणार असून याकरिता संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार असून पुढील १० वर्षे १०० मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार २०२०चे विजेते रणजितसिंह डिसले यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कार रक्कमेतील साडे तीन कोटींची रक्कम ९ देशातील शिक्षकांना वाटून दिली होती. इटलीचे कार्लो मझुने हे त्यापैकी एक होते.
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक असलेले रणजितसिंह डिसले यांना गेल्या वर्षी सप्टेंबर २०२०मध्ये सात कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुरस्काराची रक्कम शिक्षण प्रसारासाठीच वापरण्याची घोषणा त्यांनी केली. त्यासाठी अर्धी रक्कम म्हणजे साडेतीन कोटी अंतिम फेरीतील अन्य नऊ शिक्षकांना देण्याचे डिसले यांनी जाहीर केले होते. त्यानुसार अंतिम फेरीतील इटली येथील शिक्षक कार्लो मझोने यांनाही रक्कम देण्यात आली.