सोलापूर - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अश्वाचे शेवटचे गोल रिंगण आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाखरीच्या पालखी तळावर मोठ्या उत्साहात पार पडले. रिंगण सोहळ्यापूर्वी आलेल्या पावसाने वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला.
सुरुवातीला मानाच्या झेंडेकऱ्यांना धावा बोलत सर्वांना अश्वाच्या आगमनाचा संदेश दिला गेला. त्यानंतर अश्वाने तीनवेळा रिगण पूर्ण केले. अश्वाच्या धाव्यानंतर त्याच्या टापांखालची माती कपाळी लावण्याची परंपरा वारकरी संप्रदायात आहे. त्यामुळे ही माती माथी लावण्यासाठी वारकऱ्यांनी रिंगणांत धाव घेतली आणि या रिंगण सोहळ्याची सांगता झाली. पाऊस पडत असताना देखील विठ्ठलभक्तांनी या रिंगण सोहळ्याला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील अश्वांच्या रिंगाणाचे महत्त्व -
माऊलींच्या पालखी सोहळ्यात वेगवेगळ्या पद्धतीने माऊलींची पूजा बांधली जाते. रिंगण सोहळा ही एक पूजा आहे. समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन माऊलींची पूजा बांधतात. टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष सुरू असतानाच अश्वांचे रिंगण सुरू होते व या रिंगणाच्या माध्यमातून माऊलींचे विश्वरूप दर्शन वारकऱ्यांना होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात अश्वांचे उभे रिंगण, गोल रिंगण केले जाते. या रिंगणामध्ये धावणाऱ्या एका अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज स्वार झालेले असतात, तर दुसऱ्या अश्वावर सरदार असतो, अशी वारकऱ्यांची भावना आहे. रिंगण सोहळा संपताच वारकरी अश्वांच्या टापाखालची माती माथ्यावर लावण्यासाठी वारकरी गर्दी करीत असतात.