सोलापूर - महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल (Hershal Bagal, spokesperson of Sambhaji Brigade) यांनी केला आहे. महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नागपूर आणि गुजरातमधून राज ठाकरे यांना पुढे केले जात आहे. आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून हा प्रयत्न केला जात आहे. पण राज ठाकरे यांनी ठरवलं पाहिजे की इतिहासावर बोलत असताना आपण अभ्यास करून बोललं पाहिजे. त्यामुळे ते बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचे नातू आहेत की प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे (Keshav Sitaram Thackeray) यांचे नातू आहेत? असा सवाल देखील संभाजी ब्रिगेड प्रवक्ते हर्षल बागल यांनी केला आहे.
संभाजी ब्रिगेडचा राज ठाकरेंना प्रश्न
'प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनी पूर्ण महाराष्ट्राचे प्रबोधन त्यांच्या साहित्यातून केले. त्यांनी त्यांच्या रंगो बापुची नावाच्या 40 पानांच्या पुस्तकात पुरंदरे यांची सर्व चलाखी उघड केली आहे. ते पुरंदरेच्या लेखनाला भटी लिखाण म्हणतात. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील हे कसले शाहीर? हा तर सोंगाड्या आहे, असे विधान केले होते. जेम्स लेनच्या नावाखाली जिजाऊंची व शिवरायांची बदनामी करणारे हेच ते पुरंदरे आहेत. पंढरपूरला अमरजित पाटील यांच्याकडे शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी गुरू नाहीत, हे लेखी देऊन माफी मागावी लागली होती. जेम्स लेन समर्थक बहुलकरांच्या तोडांला पुण्यात शिवसेना पदाधिकारी व शिवप्रेमींनी काळे फासले होते. त्यांना माफी मागायला राज ठाकरे यांनी भाग पाडले होते. त्यामुळे आपण प्रबोधनकरांचे नातू आहात की पुरंदरेंचे? ते आधी एकदा स्पष्ट करावे', असा सवाल हर्षल बागल यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
पुरंदरेंचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' महाविकास आघाडी सरकारने परत घ्यावा- संभाजी ब्रिगेड
'तत्कालिन फडणवीस सरकारने पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार(Maharashtra Bhushan Award) दिला. त्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला देशभरातील साहित्यीक अभ्यासक, दोन्ही छत्रपती तसेच प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी, शिवप्रेमींनी, अनेक संघटनांनी विरोध केला. तरीही खुर्चीचा व सत्तेच्या बळाचा वापर करत पुरस्कार दिला गेला व त्या पुरस्काराची किमंत कमी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने (MahaVikas Aghadi government) पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा', अशीही मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
ठाकरे काय उत्तर देणार?
त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या या सर्व आरोपांवर आणि प्रश्नांवर राज ठाकरे, त्यांचे नेते आणि ठाकरे सरकार काय प्रत्युत्तर देणार? याकडे लक्ष लागले आहे.
या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेड प्रवक्ते हर्षल बागल, जिल्हाअध्यक्ष संभाजी भोसले, महानगरअध्यक्ष श्याम कदम, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सीताराम बाबर, जिल्हा सचिव राहुल सावंत, संघटक सुलेमान पीरजादे, दत्ता जाधव आदी उपस्थित होते.
हेही वाचा - कोरोनाच्या भीतीने उच्चशिक्षित दाम्पत्याने घेतला गळफास, कोराना रिपोर्ट आला निगेटिव्ह