सोलापूर- संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने नववर्षाचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ व्यसनमुक्तीचा संकल्प करून करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ व्यसन मुक्तीची शपथ घेण्यात आली. त्याचबरोबर, युवकांसाठी 'दारू नाही दूध प्या' हा उपक्रम राबविण्यात आला.
नवीन वर्षानिमित्त संभाजी ब्रिगेडकडून सर्व महिला भगिनींना योग्य मान सन्मान राखून त्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला. संभाजी ब्रिगेडकडून सलग चौथ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेड छत्रपती संभाजी महाराज यांना आदर्श मानून विविध सामाजिक कार्य समाजासाठी करीत आहे. छत्रपती संभाजीराजे हे बुद्धिमान, चारित्र्यवान, सुसंस्कृत, महापराक्रमी राजे होते. त्यांनी उभ्या आयुष्यात कसलेही व्यसन केले नाही. ते उत्कृष्ट कूस्तीपटू होते. त्यांना व्यायामाची अत्यंत आवड असल्याने त्याचे शरीर बलदंड होते. संभाजी महाराजांच्या नावाने आपली संघटना असून त्यांचा आदर्श घेऊन व्यसनमुक्तीचा संकल्प करण्यात आला असल्याचे संभाजी ब्रिगेडचे शाम कदम यांनी सांगितले.
आजचा युवक पाश्चात्य देशाचे अनुकरण करून दिवसेंदिवस व्यसनाधीन होत आहे. नववर्षाच्या निमित्ताने दारू, मटण, डीजेची पार्टी करून व गाडीच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून कर्णकर्कश हॉर्न वाजवत इतर नागरिकांना त्रास होईल, असे वागताना दिसतात. ही आपली संस्कृती नाही याचे भान युवकांनी ठेवले पाहिजे. तसेच, आपल्यामुळे समाजातील इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्याची गरज असल्याचेही शाम कदम यांनी सांगितले.
हेही वाचा- 'विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आजपासून मोबाईल बंदी', निर्णयाचे भाविकांकडून स्वागत