सोलापूर: शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोन पोलिसांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे सोलापूर शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल जयप्रकाश चंद्रशा कांबळे व पोलीस नाईक कीर्तीराज शाहू राज अडगळे, असे गुन्हा दाखल असलेल्या संशयित पोलीस आरोपींची नावे आहेत.
दरोड्याच्या गुन्ह्यात कांबळे हा संशयित पोलीस आरोपी अटक आहे. तर दुसरा संशयित पोलीस किर्तीराज अडगळे हा विजापूर नाका पोलीस ठाण्यातून पळून गेला. ही घटना गुरुवार दि. 20 ऑगस्ट रोजी घडली.
याबाबतची सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे की, सोरेगाव परिसरात म्हंतपा कलशेट्टी यांची शेत जमीन आहे. त्यांच्या शेजारी उद्योजक रामरेड्डी यांची शेत जमीन आहे. या शेतजमीनीमध्ये अतिक्रमण झाल्याचे पाहून 5 ते 6 जण शेतात जाऊन अतिक्रमण काढत होते. त्यावेळी म्हंतप्पा कलशेट्टी यांची भिंत पडली होती. यावेळी मोठी वादावाद देखील झाली होती. म्हंतप्पा कलशेट्टी यांच्या कामगाराकडील मोबाईल काढून घेतल्याने राम रेड्डीसह 10 ते 12 जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
या दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्याकडे असून ते तपास करताना त्या घटनेच्या वेळी पोलीस हवालदार कांबळे आणि अडगळे या दोघांच्या मोबाईलवर आरोपींनी फोन केल्याचे उघड झाले आहे. त्यावरून दरोड्याच्या गुन्ह्यात या दोघा पोलिसांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी तपासात उघड झाले आहे. या कारणावरून दोन्ही पोलिसांवर गुरुवारी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये हवालदार कांबळे याला अटक करण्यात आली आहे. तर पोलीस नाईक किर्तीराज अडगळे याला अटक करतानाची प्रक्रिया करताना लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून त्याने विजापूर नाका पोलीस ठाण्यातून पळ काढला. म्हणून त्याच्या विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे याांनी तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेंबडे करीत आहेत.
पोलीस ठाण्यातून संशयित आरोपी पोलीसाचे पलायन
विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोन पोलिसांवर गुन्हा दाखल होताच, पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी हे माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. गुन्हा दाखल करतानाची प्रक्रिया करताना अडगळे हा संशयित पोलीस आरोपी याने लघुशंकेस जातो असा बहाणा करून पोलीस ठाण्यातून पलायन केले. शहर पोलीस दलातील पोलीसच दरोड्यामध्ये सहभागी असल्याचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांची प्रतिमा मालिन होत चालली असल्याचे चित्र दिसत आहे.