सोलापूर : जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील शिंगणापूर जवळील कोथळे घाटात भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील तीन आरोपींना नातेपुते पोलिसांनी जेरबंद केले आहे. राहुल आप्पासाहेब माळी (वय 19, मुसळवाडी ता.राहुरी), राहुल उर्फ टग्या एकनाथ बर्डे (वय 22, पडेगाव ता. श्रीरामपूर), संदीप सुरेश पिंपळे (वय 22, मानेगाव ता. सिन्नर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, तुळजापूर येथील महिला भाविक जेजुरी येथे देवदर्शन करून शिंगणापूर येथील महादेवाच्या दर्शनासाठी गाडीने चालल्या होत्या. दरम्यान, कोथळे घाटात 11 मार्चरोजी रात्री 10 च्या सुमारास त्यांची क्रुझर गाडी आडवून अनोळखी सहा व्यक्तींनी गाडीच्या काचा फोडल्या. तसेच, गाडीत असलेल्या महिलांना व पुरुषांना शिवीगाळ व दमदाटी करून 1लाख 5 हजार सहाशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेले होते.
याबाबत नातेपुते पोलीस ठाणे येथे वाहनचालक चैतन्य सखाराम बडूरे यवती ता. तुळजापूर याच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय बातमीदाराकडून संशयित आरोपी हे फलटण तालुक्यातील गोखळी गावात वीटभट्टीवर काम करत असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी चौकशी केली असताना आरोपी हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील असल्याचे समजले. त्यानंतर, नातेपुते पोलिसांनी तपास पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले. या कारवाईत संशयित व्यक्ती नावे राहुल माळी, राहुल उर्फ टग्या एकनाथ बर्डे, संदीप सुरेश पिंपळे या तिघांना माणुरी ता. राहुरी येथून ताब्यात घेण्यात आले.
या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे हे करत आहेत. तर, उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल गणपत गडदे, शरद रामलिंग कदम, राहुल सुग्रीव रणवरे, पोलीस नाईक महेश भास्करराव पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राकेश माणिक लोहार व सायबर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रवी हातकिले यांनी केलेला असून गुन्ह्याचा अधिक तपास नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे करीत आहेत.