पंढरपूर- सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने तडाखा दिला आहे. जिल्ह्यात दोन दिवसांत 37.8 मिमी पाऊस पडला आहे. शनिवारी दुपारनंतर अचानक मेघ दाटून येताच विजेच्या कडकडासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले. सध्या खरीपातील उडीद, मुगाची रासणी अनेक भागात सुरू आहे. तर पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील काही भागात केळी, डाळींब, सोयाबीन आणि उडीद शेतात काढून पडला आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे खरीप पिके पूर्णपणे पाण्यात गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी रब्बी पेरणीच्या कामात व्यस्त असतानाच शनिवारी सायंकाळी या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक गावांना झोडपून काढले. शेतकर्यांनी शेतात काढून ठेवलेली खरिपातील उडीद, मूग, सोयाबीनची पिके पाण्यात गेली आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पंढरपूर, माळशिरस तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी इटीव्ही भारतशी बोलताना केली.
पावसात वीज पडून चोपडी येथील शकुंतला बाबूराव खळगे (वय 55), तर हंगिरगे येथील शुभम शाहू साबळे (वय 23) यांचा मृत्यू झाला. तसेच वाकी-घेरडी येथील गणपत महादेव माळी यांच्या 4 शेळ्या दगावल्याची घटना घडली आहे.
दुसरीकडे रब्बीच्या पेरण्या सुरू असताना गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबून पडल्या आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे शेती पिके आणि फळबागांचे नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असतानाच दुसर्यांदा जिल्ह्याला पावसाने झोडपले.