सोलापूर - मुलगा रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही, अशी परिस्थिती मराठा समाजाची झाली आहे. मागणी वाढल्या शिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजातील नागरिकांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पत्रे लिहून आरक्षणाची मागणी करावी. असे, आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत केले आहे.
सोलापूरसह राज्यात मराठा समाजाने आरक्षणसाठी यापूर्वी 58 मूक मोर्चे काढले. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नव्हते. अनेक पक्षाचे नेते व कार्यकर्ते मराठा मोर्चाच्या मागे होते. मराठा समाजातील नेते कोणतेही राजकारण न आणता मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा दिला होता. म्हणून 58 मूक मोर्चे शांततेत पार पडले. यापुढेही अशीच एकजूटता दाखवणे गरजेचे असल्याचे मत,आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
'चाळीस वर्षांपासून आरक्षणासाठी मराठा समाजाचे संघर्ष'
मागील चाळीस वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. चाळीस वर्षांपासून या समाजाला आरक्षण मिळाले नाही. मराठा समाजात शेतकरीवर्ग मोठया संख्येने आहे. या शेतकऱ्यांना आपण पोशिंदा म्हणतो. या पोशिंद्याला आरक्षण मिळाले पाहिजे. यामुळे समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. समाजासाठी आपण यापुढेही कायम सोबत असल्याची ग्वाहीही आमदर सुभाष देशमुख यांनी यावेळी दिली.