सोलापूर - सोलापूर जिल्ह्याला कोरोना लसीचे दोन लाख डोस मिळाले आहेत. शनिवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील 150 केंद्रांवर दोन लाख लोकांना कोरोना लस देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यापूर्वी दिली होती. त्यानुसार शहरात आणि जिल्ह्यात लसीकरण झाले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अधिकृत माहिती दिली. जिल्ह्यातील 16 लाख 14 हजार नागरिकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्यात सोलापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
सोलापुरात आजतागायत झालेले लसीकरण -
आतापर्यंत कोविशिल्डच्या लसीचे 14 लाख 22 हजार 840 डोस मिळाले आहेत. कोवॅक्सिनचे 82 हजार 640 इतके डोस मिळाले आहेत. ऑगस्टपर्यंत 11 लाख 74 हजार 310 जणांना कोरोनाचा पहिला, तर 4 लाख 39 हजार 720 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अशाप्रकारे सोलापुरात एकूण लसीकरण 16 लाख 14 हजार इतके झाले आहे.
16 हजार 400 नागरिकांचे लसीकरण -
11 सप्टेंबर रोजी शहरातील सर्वच केंद्रांवर लसीकरण करण्यात आले होते. कोविशिल्ड लसीचा मोठा साठा महापालिकेकडे उपलब्ध झाल्याने प्रत्येक केंद्रावर 400 लस उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. सोलापूर शहरातील सरकारी व खासगी असे एकूण 41 केंद्रांवर लसीकरण झाले आहे. वय वर्षे 18 पुढील सर्व नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला गेला. प्रत्येक केंद्रावर ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने पहिल्या डोससाठी 200 तर दुसऱ्या डोससाठी 200 असे एकूण 400 लस उपलब्ध करून देण्यात आले होते. आजपर्यंतचा हा सर्वाधिक मोठा साठा असून, उपलब्ध साठ्यातून शहरातील 16 हजार 400 नागरिकांचे लसीकरण झाले.
हेही वाचा - साकीनाका प्रकरणातील दोषींवर 'अॅट्रॉसिटी'अन्वये गुन्हा दाखल करण्याची भीम आर्मीची मागणी