सोलापूर - नांदेडनंतर आज सोलापुरात मोदी-शहांच्या विरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. कर्णिक नगर येथील विशाल मैदानावर ही सभा होत आहे. सभास्थळी एक लाखांवर जनसमुदाय गृहीत धरून सभेचे नियोजन करण्यात आले आहे.
मनसेचे स्थानिक नेते सभेच्या तयारीत व्यस्त असून मुंबईतील वरिष्ठ नेते प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत आहेत. या सभेचे सोलापूरकरांत कुतूहल असून आज राज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेला आज सायंकाळी सहा वाजता सुरुवात होणार असून आतापासूनच ग्रामीण भागातून मनसैनिक यायला सुरुवात झाली आहे.