मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत अखेर महायुती सरकारने निर्णय घेतला असून, यापैकी सात जागांवर नियुक्तीसाठी राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवण्याची माहिती समोर येत आहे. 12 पैकी सात आमदारांच्या नावांचा प्रस्ताव असून उरलेल्या नावांबाबतही लवकरच विचार करण्यात येणार असल्याचे सत्ताधारी पक्षातील आमदारांनी सांगितले.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचे घोंगडे गेल्या पाच वर्षांपासून भिजत पडले आहे. महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली बारा आमदारांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी स्वीकारली नव्हती. त्यामुळे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये तणावाचे वातावरण होते. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने आणि आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने अखेर महायुती सरकारने याबाबत निर्णय घेण्याचे ठरवले आहे. राज्य सरकारने 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू केले असले तरी प्रत्यक्षात सध्या सात आमदारांचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती समोर येत आहे.
काय आहे प्रस्ताव? : बारा आमदारांच्या नियुक्ती पैकी सात आमदारांचा प्रस्ताव पाठवला असून यामध्ये भाजपाकडून तीन नावे, शिवसेनेकडून दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन अशा एकूण सात जणांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांकडे गेला आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इदरीस नायकवडी यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांना यश मिळण्यासाठी आणि प्रचारामध्ये बाजी मारण्यासाठी ज्या नावांचा विचार होऊ शकतो अशा पदाधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागल्यानंतर याबाबतची नियुक्ती करता येणार नाही. त्यामुळे तत्पूर्वीच राज्यपालांकडून याबाबत नियुक्ती व्हावी यासाठी आता सरकार जोरदार प्रयत्न करत आहे.
हेही वाचा