सोलापूर - देशभरामध्ये कोरोना विषाणूनाच झपाट्याने प्रसार होत असून त्याला रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र, बऱ्याच ठिकाणी लोक मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील जोडभावी पेठ पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या तब्बल 200 जणांवर कारवाई केली आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवशंकर बोदर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहा दिवसांच्या लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. मास्कचा वापर न करता विनाकारण भटकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. 16 जुलै ते 26 जुलै असे 10 दिवस कडक लॉकडाऊन सोलापुरात लागू करण्यात आले आहे. त्याची सक्त अंमलबजावणी पोलीस प्रशासनाचे व जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी करत आहेत. गुरुवारी सकाळी याची अंमलबजावणी करताना जोडभावी पेठ पोलिसांनी विना मास्क फिरणारे व लॉकडाऊन नियमभंग करणाऱ्या जवळपास 200 जणांना ताब्यात घेतले व त्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सोलापुरात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस पेट्रोलिंग करत आहेत. विना मास्क फिरणारे व अनावश्यक फिरणाऱ्यांना टवाळखोरांना पोलीस चांगलाच धडा शिकवत आहेत. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत 188 नुसार कारवाई करण्यात येत आहे. ताब्यात घेतलेल्यांना पोलीस व्हॅनमध्ये आणून त्यांची सर्व माहिती घेत, त्यांवर कारवाई करत आहेत.