पंढरपूर - उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर शहरामध्ये जावेद हबीब याने हेअर कटची कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये एका महिलेच्या केसाला पाणी न मारता थुंकून हेअर कट केला. या कृत्यामुळे नाभिक समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. जावेद हबीब याच्या निषेधार्ध राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जावेद हबीब याच्या प्रतिमेस जोडे मारो व थुंकून आंदोलन करण्यात आले.
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी दोन दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे हेअर कटिंग संदर्भात सेमिनार घेतला होता. या सेमिनारमध्ये महिला वर्गासमोर केस कापत असताना पाण्याचा वापर न करता थुंकूण मारली होती. त्यामुळे जावेद हबीब यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रीय नाभिक युवक संघटनेच्या वतीने या घटनेचा जोरदारपणे निषेध करण्यात आला. यावेळी नाभिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जावेद हबीब याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.