सोलापूर : सध्या संपूर्ण देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचे भाव वाढल्याने याचा परिणाम गृहिणींच्या बजेटवर झाला आहे. तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी सकाळी बीडच्या शेतकऱ्याने कोथिंबीरला भाव न मिळाल्याने, रस्त्यावर कोथिंबीरच्या पेंढ्या फेकून दिल्या. एका कॅरेटला 50 रुपये खर्च आला आणि भाव मिळाला फक्त 10 रुपये प्रति कॅरेट. एवढा खर्च करून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर आणली आणि सोलापुरातील मार्केट यार्डात भाव घसरला. निराश होत शेतकऱ्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतच कोथिंबीरच्या पेंढ्या रस्त्यावर फेकून दिल्या. वैभव शिंदे (रा,नेगणुर,जि बीड) असे युवा शेतकऱ्याचे नाव आहे.
दोन एकरात कोथिंबीर लागवड केली होती : पावसाळा सुरू झाला की, भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. बीड येथील युवा शेतकऱ्याने शेतात दोन एकरात कोथिंबीरची लागवड केली होती. कोथिंबीरला फुले लागण्याअगोदर त्याची तोडणी करून त्याला वेळेत बाजारपेठ मध्ये विकणे आवश्यक असते. वैभव शिंदे या शेतकऱ्याने दोन एकर शेतातील कोथिंबीर टेम्पो मधून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी विक्रीसाठी आणली होती.
भाव मिळाला फक्त 10 रुपये प्रति कॅरेट : वैभव शिंदे या युवा शेतकऱ्यास बीड येथून कोथिंबीर आणण्यासाठी लागवडीसह एकूण 50 रुपये प्रति कॅरेटला खर्च झाला. मात्र भाव मिळाला फक्त 10 रुपये प्रति कॅरेट. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरचे भाव शनिवारी घसरले होते. प्रति कॅरेटला 10 रुपये मिळत होते. त्यामुळे वैतागून शेतकऱ्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरच्या पेंढ्या फेकून देण्यास सुरुवात केली. यावेळी सोलापूर मार्केट यार्डात बघ्यांची गर्दी मोठी झाली होती.
हेही वाचा -