बार्शी (सोलापूर) बार्शीकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पंतप्रधान आवास योजनेला नगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थगिती देण्यात आली आहे. विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांच्या उपसूचनेनंतर योजनेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरातील गाडेगाव रोडलगत 114 लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना मंजूर झाली आहे. मात्र, निविदामध्ये अनियमितता असल्याने ही योजना रखडली आहे. निविदा मंजूर करण्याची शेवटची मुदतही होऊन गेली असताना, आता योजना मार्गी लागणार की निधी परत जाणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, नगरपालिकेच्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडण्यात आला. मात्र, योजनेंतर्गत मंजूर झालेला निधी आणि प्रत्यक्षात होणारा खर्च यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्चाचा भार लाभार्थ्यांवर का ? असा सवाल न.प. चे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी उपस्थित केला. यामुळे या विषयाला स्थगिती देण्यात आली आहे.
घरांच्या खर्चात वाढ
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 2016 साली शहरातील गाडेगाव रोडलगत 114 घरकुल उभारण्यास मंजुरी मिळाली होती. शिवाय आतापर्यंत 4 वेळा या निविदाची प्रसिद्धीही करण्यात आली होती. परंतु, निविदातील अनियमिततेमुळे ही योजना रखडलेली आहे. सोमवारच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मार्गी लावण्यात येणार होता. मात्र, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, नगरसेवक विलास रेणके यांनी यासंबंधीच्या निविदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लाभार्थ्यांना 6 लाख 50 हजारात घरकुल मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात 8 लाख 50 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे अतिरिक्त खर्चाचा भार लाभार्थ्यांवर का असा सवाल विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांनी उपस्थित केला होता. वेळेत योजना मार्गी लागलेली नाही त्यामुळे काळाच्या ओघात घरकुल उभारण्याची रक्कम वाढली आहे. परंतु, यामध्ये प्रशासन आणि सत्ताधारी यांची चूक असताना भुर्दंड हा सर्वसामान्य नागरिकांना का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. याचबरोबर आगामी नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही योजना मार्गी लावण्याचा घाट सत्ताधाऱ्यांचा असल्याचा आरोप देखील अक्कलकोटे यांनी केला आहे. त्यामुळे आता या योजनेला स्थगिती देण्यात आली असून, रखडलेली योजना आता मार्गी लागणार की नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा - पंतप्रधान व योगी आदित्यनाथांची सोशल मीडियावर बदनामी; पुण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल