सोलापूर - कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी डाळिंबांची आवक कमी झाली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने फळांच्या आवकवर त्याचा परिणाम झाला आहे. पण, डाळींबाला मागणी असल्याने दरात तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे. आज डाळिंबाला प्रतिक्विंटल किमान ६०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक १० हजार रुपये असा दर मिळाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या सप्ताहात डाळिंबाची आवक रोज एक ते दीड टन होत होती. ही आवक अगदीच ५०० क्विंटल ते एक टनापर्यंत राहिली. तर दर किमान ८०० रुपये, सरासरी २८०० रुपये आणि सर्वाधिक ९५०० हजार रुपये, तर पंधरवड्यापूर्वी किमान ७०० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक १० हजार रुपये दर मिळाला. दरात किरकोळ चढ-उतार वगळता दर काहीसे स्थिर पण तेजीत राहिले.
डाळिंबांची सर्व आवक जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, माढा, मोहोळ या भागांतूनही झाली आहे. आधीच सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे डाळिंबांची आवक अगदीच कमी होताना दिसत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आवकमध्ये निम्म्याने घट झाली आहे. त्यामुुळे साहजिकच, डाळिंबाला चांगला दर मिळत आहे. या आठवड्यातही परिस्थिती स्थिर होती. मात्र येत्या काही दिवसांत डाळिंबाची आवक आणखी कमी होईल, तसे दरात आणखी वाढतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.