सोलापूर - संपूर्ण संचारबंदीच्या काळात विनाकारण मोकाट बाहेर फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी अजब कारवाई केली आहे. मोकाट फिरणाऱ्या लोकांना एकत्रित करून लहानपणी खेळण्यात येणारे खेळ भर रस्त्यावर खेळायला लावले.
सोलापूरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असे असले तरी अनेकजण प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या आवाहनाला केराची टोपली दाखवत मोकाट फिरत असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन दिवसापासून सोलापूरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण संचारबंदीच्या काळातही सोलापूरातील काहीजण विनाकारण मोकाट फिरत होते. अशा विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर जोडभावी पेठ पोलिसांनी चांगलीच कारवाई केली आहे. जोडभावी पेठ परिसरात फिरणाऱ्यांना पोलिसांनी धरुन वर करून गोल रिंगण घालणे, उठबशा काढायला लावणे यासारख्या शिक्षा पोलिसांनी दिल्या आहेत.