माढा (सोलापूर) - माढा तालुक्यातील दारफळ (सिना) गावात वास्तव्यास असलेला पोलीस कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचा संपर्कात आलेल्या ११ जणांना होम क्वारंटाइन केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत पलंगे यांनी दिली आहे.
बार्शी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले बुद्रुकवाडी व निंमगाव (मा.) गावातील रहिवासी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे बार्शीत स्वॅब घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
दारफळ (सिना) गावचे रहिवासी असलेले पोलीस कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आल्याची माहिती समोर येताच प्रशासन सतर्क झाले. माढा पोलिसांनी संबंधित पोलीस राहत असलेला भाग कंटेनमेंट झोन जाहीर करत तो भाग सील केला आहे. तहसीलदार राजेश चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमोल शिंदे यांनी गावास भेट देऊन पोलिसाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली.
संबधित पोलीस कर्मचारी हा बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असून तो दारफळमध्ये राहत असल्याने अप-डाऊन करत होता.तसेच त्याने बार्शीतून लिलाव पद्धतीने भाजीपाला आणून घरी विक्रीसाठी ठेवला होता.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या पोलीस कर्मचाऱ्याला त्रास होऊ लागल्याने ते २३ जूनला माढ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आले होते. त्यानंतर त्यांना बार्शी आरोग्य विभागाने क्वारंटाइन करुन २५ जूनला स्वॅब घेतले होते. २६ ला रात्री उशिरा त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. मानेगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. शिंदे हे त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेत आहेत.