सोलापूर - अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकाने अवैध वाळू उपशावर कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 1 कोटी 37 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, तहसील प्रशासन मूग गिळून गप्प असल्याने, दरवेळी पोलिसांनाच वाळू उपशावर किंवा वाळू वाहतुकीवर कारवाई करावी लागते.
सीना नदी पात्रात झाली कारवाई -
सीना नदीच्या पात्रात पोलिसांनी कारवाई करत वाळूसह मुद्देमाल जप्त केला आहे. नदी पत्रात वाळू माफियांनी बोट लावून अवैध वाळू उपसा सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवानंद टेगल, सिद्धाराम टेगल दोघे (रा. कोर्सेगाव), सागर संजय अभंगराव (रा. नांदनी), आकाश माणिक कांबळे(रा. बरूर), मेहबूब मुलूक बंदगी(रा. इंगळगी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
तहसील प्रशासनाचे दुर्लक्षच -
अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीना नदीच्या पात्रात बिनधास्तपणे बोट लाऊन अवैध वाळू उपसा सुरू होता. मात्र, तहसील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे या वाळू माफियांचे फावत होते. वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई करत 1 कोटी 37 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे संशयीत आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वाळू उपसा करणारी बोट, हायवा ट्रक आणि वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.