सोलापूर- शहरातील भुलाभाई चौकातील प्लास्टीकच्या रिकाम्या बॅरेल गोडाऊनला आज दुपारी तीनच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आग अटोक्यात न आल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीच्या घटनेत लाखोंचे नुकसान
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहाणी झाली नाही. मात्र आगीत शेकडो प्लास्टिक बॅरल जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. ज्या परिसरात आग लागली होती, तो परिसर दाट लोकवस्तीचा आहे. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
प्लास्टिकच्या धुरामुळे नागरिकांना श्वासनाचा त्रास
शहराच्या मधोमध असलेल्या प्लास्टिक गोडावूनला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. प्लास्टिकच्या धुरामुळे नागरिकांना काही काळ श्वासनाचा त्रास देखील झाला. दरम्यान अद्याप आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.