पंढरपूर - सांगोला तालुक्यातील अनेक सहकारी संस्था अवसायनात निघू लागल्या आहेत. गैरव्यवस्थापन, संस्थापक आणि संचालक मंडळाची उदासीनता, लेखापरीक्षण न करणे, निवडणुका न घेणे, हितसंबंध व इतर कारणांमुळे अनेक सहकारी संस्था मोडकळीस आल्या आहेत. शासकीय निकष पूर्ण करू शकत नसलेल्या सांगोला तालुक्यातील 24 सहकारी संस्था अवसायनात निघणार आहेत. सहकारी संस्था, दूध उत्पादन संस्था अशा मिळून 24 संस्थांना कायमस्वरूपी टाळे ठोकण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती साहाय्यक निबंधक एम. एल. शिंदे यांनी दिली.
सांगोला शहर व तालुक्यात सूतगिरणी, साखर कारखाना, बँका, पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, मजूर संस्था, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, दूध संस्था या संस्थांसह 302 सहकारी संस्थांचे जाळे पसरले आहे. सहकारी संस्थांमधील अनियमित व्यवस्थापन, संचालक मंडळाचे दुर्लक्ष अशा विविध कारणांमुळे ग्रामीण भागातील सहकारी संस्था, साखर कारखाना, पतसंस्था, दूध संस्था या सारख्या संस्था अनेक वर्षांपासून बंद आहेत.
कामकाज बंद असलेल्या सांगोला तालुक्यातील 24 सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करून, अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संबंधित सहकारी संस्थांना सहायक निबंधक कार्यालयाने अंतिम नोटीस देऊन कार्य अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर या संस्थांची नोंदणी रद्द करून अवसायनात काढण्यात येईल, असे नमूद केले आहे. संस्थांची ऑनलाईन नोंदणी, लेखापरीक्षण, निवडणूक व अन्य बाबींच्या आधारावर सहकारी संस्थेचे सहायक निबंधक शिंदे यांनी या संस्थांची तपासणी करत, या संस्थांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.